फ्रॉड; छत्तीसगडमधून सहा आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 01:24 PM2024-05-17T13:24:19+5:302024-05-17T13:24:48+5:30

Amravati : आभासी नफा दाखवून ३१.३५ लाखांनी गंडविले

fraud; Six accused from Chhattisgarh jailed | फ्रॉड; छत्तीसगडमधून सहा आरोपी जेरबंद

fraud; Six accused from Chhattisgarh jailed

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
शेअर मार्केटमध्ये आभासी नफा दाखवून परतवाडा येथील एकाला ३१ लाख ३५ हजारांनी गंडविणाऱ्या टोळीतील आणखी सहा आरोपींना ग्रामीण सायबर पोलिसांनी छत्तीसगड राज्यातून बुधवारी अटक केली. या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे अटक आरोपींची संख्या दहा झाली आहे. रितेश अजंगले (२४, रा. ठठारी), मायकल साहू (२४, रा. जैजैपुर), रवींद्र यादव (२९, रा. बसंतपूर), अमन हरपाल (३८, रा. कातुल बोर्ड), शैलेंद्रसिंग चव्हाण (३५, रा. भरकापारा) व दिगंत अवस्थी (३८, रा. बनभेडी, छत्तीसगढ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परतवाड्यातील आशिष बोबडे (४४) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट अॅनालिसीस अॅण्ड लर्निंग' या नावाचा शेअर मार्केट ग्रुप जॉईन केला. वेबसाइट लिंकद्वारे त्यांनी ३१.३५ लाखांचे शेअर खरेदी केले, पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ती वेबसाइट बंद दिसून आली. त्यामुळे त्यांनी ग्रुपमधील मोबाइल क्रमांकावर कॉल केला. मात्र, मोबाइलही बंद होता.


बँक खात्यांची साखळी
सायबर पोलिसांच्या तपासात आरोपी वेगवेगळे मोबाइल वापरत असून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्ळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठविल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्या बँक खात्यांची साखळी जोडून तपशिलाच्या आधारावर छत्तीसगढमधील जांजगीर, रायपूर, सक्ती येथून चार आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीदरम्यान अन्य आरोपींचा सुगावा लागल्यावर त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक १० मे रोजी छत्तीसगढला रवाना झाले होते. तेथून सहा जणांना पुन्हा अटक करण्यात आली.


७० लाख गोठविले
आरोपींनी वापरलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमधील ७० लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली. आरोपींकडून बँकेचे ३ स्टॅम्प, प्रोप्रायटरचे ३ स्टॅम्प, सरपंचांचे नावे असलेला स्टॅम्प, १७ डेबिट कार्ड, ७४ धनादेश, ६० पासबुक व १ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. ही कारवाई सायबरचे पोलिस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक किरण ऑटे व निर्मला भोई, एएसआय सुनील बनसोड, पंकज गोलाईतकर, सागर धापड, रितेश गोस्वामी, रोशन लकडे, गौरव गनथडे, प्रिया मुंडेकर आदींनी केली.

Web Title: fraud; Six accused from Chhattisgarh jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.