कार जिंकल्याची बतावणी करुन ७६ हजारांनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:17 PM2021-12-12T17:17:15+5:302021-12-12T17:55:17+5:30
स्क्रॅच कार्डवर चारचाकी वाहन बक्षीस मिळत असल्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ७६ हजार ८०० रुपयांनी फसवणूक करण्यात आली.
अमरावती : कोलकात्याहून मागविलेल्या औषधानंतर पाठविलेल्या स्क्रॅच कार्डवर चारचाकी वाहन जिंकल्याची बतावणी करून ३१ वर्षीय युवकाला ७६ हजार ८०० रुपयांनी गंडा घालण्यात आला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी पश्चिम बंगालमधील एका आयुर्वेदिक औषध कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, श्यामपदक सनद अदक (३१, रा. गजानननगर, कांडली, परतवाडा) असे गंडविले गेलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने एवन आयुर्वेदिक शोध संस्थानतर्फे अभिषेक मंडल गुरुपल्ली दक्षिण शांतिनिकेतन बोलापूर एम शांतिनिकेतन बारभूम पश्चिम बंगाल या पत्त्यावरून सहा महिन्यांपूर्वी आई-वडिलांसाठी औषध बोलावले होते. या कंपनीकडून तीन महिन्यानंतर एक कूपन पाठविण्यात आले.
यामध्ये श्यामपदक याला चारचाकी वाहन बक्षीस मिळत असल्याचे स्क्रॅच कार्डवर निदर्शनास आले. त्यावर नमूद मोबाईल क्रमांकावर त्याने संपर्क साधला असता, वाहनाच्या मूळ किमतीच्या एक टक्का रक्कम अर्थात १२ हजार रुपये चार्ज भरावा लागेल, असे सांगण्यात आले. यानंतर ३९ हजार ४०० रुपये व २५ हजार रुपये वेगवेगळ्या करांसाठी मागण्यात आले. असे एकूण ७६ हजार ८०० रुपये त्याने १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान पाठविले. मात्र, प्रतीक्षा करूनही चारचाकी वाहन मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परतवाडा पोलीस ठाणे गाठून ११ डिसेंबर रोजी तक्रार नोंदविली. पोलिसांनी आयुर्वेदिक कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला प्रारंभ केला आहे.