गरजू,गोरगरिबांना होतोय मोफत रक्तपुरवठा
By admin | Published: February 9, 2017 12:13 AM2017-02-09T00:13:17+5:302017-02-09T00:13:17+5:30
रक्तदान श्रेष्ठ दान ’ परंतु हेच रक्त वेळेवर मिळाले नाही तर प्राण गमावण्याची वेळ येते.महागडे रक्त विकत घेणे अनेकदा गोरगरिबांना शक्य होत नाही.
रक्तदाता संघाची वाटचाल : दोन वर्ष, २०० शिबिरे, ११ हजार रक्तपिशव्यांचे संकलन
वरुड : ‘रक्तदान श्रेष्ठ दान ’ परंतु हेच रक्त वेळेवर मिळाले नाही तर प्राण गमावण्याची वेळ येते.महागडे रक्त विकत घेणे अनेकदा गोरगरिबांना शक्य होत नाही. ही बाब हेरून वरूडमध्ये सुरू करण्यात आलेला रक्तदाता संघ गरिबांसाठी वरदान ठरला आहे. या संघाने जिल्ह्यात रक्तदानाच्या मोहिमेला वेगळा आयाम दिला आहे. दोन वर्षात २०० रक्तदान शिबिरांमधून तब्बल ११ हजार ५०० रक्तपिशव्यांचे संकलन रक्तदाता संघाने केले आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक, रक्तदाता संघाचे संस्थापक प्रमोद पोतदार यांच्या पुढाकाराने १ जानेवारी २०१५ ला ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाची स्थापना झाली. मोफत रक्तपुरवठा करणारा वरुडचा रक्तदाता संघ राज्यात वा देशात एकमेवाद्वितीय ठरला आहे तर जिल्ह्यातील १४ तालुक्यांत वरूड तालुका हा रक्तसंकलनामध्ये मोठा आहे. रक्तदाता संघाने नागपूर, अमरावती तसेच वरूड-मोर्शी तालुक्यातील रूग्णांना रक्तपुरवठा करण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीची रक्तपेढी तसेच नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढी आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने हा उपक्र मसुरु केला. दोन्ही रक्तपेढी अंतर्गत शासन निर्णयानुसार आणि शासनाच्या अटी व नियमांना अधिन राहून मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो.
रक्तदान श्बििरे घेण्याकरीता सेवाभावी विविध संस्था, मंडळे, शासकिय कार्यालये, राजकिय पक्ष, संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळत असल्याने मोठी उभारी या रक्तदाता संघाला मिळाली आहे. या स्तुत्य उपक्रमाची अनेकांनी दखल घेऊन या कार्यात सहकार्य केले आहे. संघाद्वारे नागपूरच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णाकरीता मोफत रक्तपुरवठयाची सोय व्हावी म्हणून नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढी सोबत लेखी क रार करुन नागपूरात सुद्धा मोफत रक्ताची सुविधा उपलब्ध केली आहे. मोफत रक्तपुरवठा करणारा रक्तदाता संघासारखी संस्था राज्यातच नव्हे तर देशात कठेही नाही, हे विशेष. (तालुका प्रतिनीधी )
राजाश्रयाची गरज
रक्तदाता संघाला राजाश्रयाची गरज असून शासनकर्त्यांनी सुद्धा सहकार्य केल्यास वरुडला शासकिय रक्तपेढी स्थापन होऊ शकते. ही उणीव भरून काढण्याकरीता रक्तदाता संघाचेवतीने पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.अनिल बोंडे यांच्यासह अनेकांना तसा प्रस्ताव दिला आहे. ग्रामीण रुगणालय संलग्न रक्तदाता संघाला माजी आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक राऊत, रक्तपेढीचे जाधव, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकिय अधीक्षक शामसुंदर निकम, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक प्रमोद पोतदार तसेच हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की यांचे सहकार्य मिळत आहे.
मानवाचे रक्त हे केवळ ३३ दिवसच टिकते. यामुळे चक्राकार पद्धतीने रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे असते. याकरिता शासकिय कार्यालयाचे प्रमुख, सेवाभावी संस्था, सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी सहकार्य करावे.यामुळे या चळवळीला गती येईल.
-प्रमोद पोतदार,
अध्यक्ष, रक्तदाता संघ, वरूड