रस्ते, संकुल अतिक्रमणातून घेणार मोकळा श्वास
By admin | Published: February 13, 2016 12:06 AM2016-02-13T00:06:02+5:302016-02-13T00:06:02+5:30
शहरातील विस्कटलेली वाहतूक व्यवस्था, रस्त्यालगतचे अतिक्रमण व संकुलातील गायब वाहनतळे शोधून काढण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
विभागीय आयुक्तांचे निर्देश : सुनील देशमुख यांचा पुढाकार
अमरावती : शहरातील विस्कटलेली वाहतूक व्यवस्था, रस्त्यालगतचे अतिक्रमण व संकुलातील गायब वाहनतळे शोधून काढण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार महापालिका, पोलीस प्रशासनाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात. आ.सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने वाहतूक, अतिक्रमण समस्येबाबतची बैठक शुक्रवारी पार पडली.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शहरातील अतिक्रमित रस्ते, संकुलातील गायब झालेली वाहनतळे यासह सामान्य नागरिकांच्या प्रश्नांविषयी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आ.सुनील देशमुख, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, पोलीस उपायुक्त पवार, माजी महापौर मिलिंद चिमोटे आदी उपस्थित होते. यावेळी आ. सुनील देशमुख यांनी शहरातील विस्कटलेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. शहराच्या प्रमुख मार्गावर रस्त्यालगत अतिक्रमित हटविण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून अधिकाऱ्यांना नि:शब्द केले. बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आ. देशमुखांनी प्रस्ताव ठेवताच विभागीय आयुक्तांनी लगेच महापालिका व पोलीस आयुक्तांना ‘एक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना केल्यात. आ. देशमुख यांनी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या आॅटोरिक्षांच्या समस्येवर हात घातला. तेंव्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी वाडेकर यांनी आॅटोरिक्षांची समस्या दूर करण्यासाठी चमू गठीत करण्याचे आश्वासीत केले. ट्रक टर्मिनल, संकुलातील वाहन तळ, रस्त्यालगतचे दुकाने अशा सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रशासनाची बाजू देखील ऐकून घेतली. दरम्यान पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्याकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांनी उपाययोजना जाणून घेतल्यात. आ. सुनील देशमुख आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चर्चेअंती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी शहरातील रस्ते व संकुलातील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
शहरातील संकुलातून गायब झालेले एकही पार्किंगस्थळ मोकळे करण्यासाठी प्रशासनाने कारवाई केली नाही. रस्त्यावर दुकाने थाटणे ही नित्याचीच बाब आहे. अतिक्रमणाबाबत लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.
- सुनील देशमुख, आमदार, अमरावती
आ. सुनील देशमुख यांच्या पत्राच्या आधारे शहरातील विस्कळीत वाहतूक, अतिक्रमण समस्येविषयी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नक्कीच ही समस्या, प्रश्न सुटून नागरिकांना दिलासा मिळेल.
- ज्ञानेश्वर राजूरकर, विभागीय आयुक्त, अमरावती
हॉकर्स झोन निर्मितीचा घेतला आढावा
महानगरात प्रस्तावित हॉकर्स झोन निर्मितीबाबत महापालिका प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा आ. सुनील देशमुख यांनी घेतला. शहरात हॉकर्सची संख्या, एकूण झोन, जागा निश्चित करण्याची प्रक्रिया अशा विविध प्रश्न उपस्थित करुन त्यांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडून माहिती जाणून घेतली.