चिरोडी-पोहरा जंगलात बिबट्यांचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:07 PM2019-07-08T23:07:42+5:302019-07-08T23:07:57+5:30
अद्भुत निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिरोडी-पोहरा जंगलात हिंस्त्र श्वापदांची संख्याही बरीच आहे. विशेषत:, बिबट्यांसाठी चिरोडी-पोहरा जंगल सुरक्षित आवास बनले आहे. या जंगलात पट्टेदार वाघाचे अस्तित्व नसल्यामुळे या जंगलातील राजे म्हणून बिबट्यांचाच सर्वत्र मुक्त संचार आहे.
अमोल कोहळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : अद्भुत निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिरोडी-पोहरा जंगलात हिंस्त्र श्वापदांची संख्याही बरीच आहे. विशेषत:, बिबट्यांसाठी चिरोडी-पोहरा जंगल सुरक्षित आवास बनले आहे. या जंगलात पट्टेदार वाघाचे अस्तित्व नसल्यामुळे या जंगलातील राजे म्हणून बिबट्यांचाच सर्वत्र मुक्त संचार आहे.
जंगलातील गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांना बिबट्याचे दर्शन होते. शहरानगतचे वडाळी व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र २१ हजार ४८५ हेक्टरमध्ये पसरले आहे. इतक्या विस्तिर्ण जंगलात वन्यप्राण्यांच्या विविध प्रजाती, पक्षी व वनस्पती आहेत. वडाळी व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत नऊ वर्षांत दहा बिबट्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला होता. तथापि, आता बिबट्यांचा वाढत्या संख्येने चिरोडी-पोहरा जंगलात मुक्त संचार वनकर्मचाऱ्यांना आढळून येतो.
समाधानाची बाब म्हणजे, चिरोडी वर्तुळातील वरूडा जंगलात पावसाळा असतानाही कृत्रिम पाणवठ्याद्वारे पाणी व्यवस्था मुबलक करण्यात येत असल्याने बिबट्यांना हे वनक्षेत्र कमालीचे भावले आहे.
वरूडा जंगलाचे सौंदर्य संरक्षणामुळे कमालीचे खुलले आहे. तथापि, या भागात पर्यटक आणि एनजीओची वर्दळ मात्र वण्यप्राणी व बिबट्याला मनस्ताप देणारी ठरत आहे. रोही, हरीण, सांबर, चितळ राण डुकरांची संख्या अधिक असल्याने बिबट्याला भूक शमविण्यासाठी पोषक वातावरण आहे. चिरोडी पोहरा मालेगाव, कारला, मार्डी, भानखेडा, गोविंदपूर सावंगा या भागातील घनदाट जंगलात बिबट्यांची संख्या २० ते २५ असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
चिरोडी वर्तुळाच्या वरूडा वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. या जंगलाची समृद्धी वाढीस लागली असून, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष दिले जात आहे. वनकर्मचाºयांना गस्तीत बिबट आढळून येतात.
- एम.के. निर्मळ
वर्तुळ अधिकारी, चिरोडी