विद्यापीठ तलावावर पट्टेदार वाघाचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:50 PM2017-10-02T22:50:05+5:302017-10-02T22:50:30+5:30
संत गाडगेबाबा विद्यापीठ परिसरात सोमवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी तेथील तलावावर पट्टेदार वाघ पाहून अवाक् झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठ परिसरात सोमवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी तेथील तलावावर पट्टेदार वाघ पाहून अवाक् झाले. सकाळीच वाघाचे दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये कुतूहलमिश्रित दहशत अनुभवायला मिळाली. तो वाघ पेंच किंवा बोर व्याघ्र प्रकल्पातून पोहरा-मालखेड जंगलात आल्याच्या वृत्ताला वनविभागाने दुजोरा दिला आहे. शहरालगतच्या परिसरात वाघाचे दर्शन घडल्याने वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. व्याघ्र दर्शनाच्या पार्श्वभूमिवर परिसरात वनकर्मचारी गस्त वाढविली आहे.
बोर अभयारण्यातून नवाब नावाचा वाघ जिल्ह्यातील जगंलात स्थलांतरीत झाला आहे. दिडशे ते दोनशे किलोमिटरचा पल्ला गाठून हा पट्टेदार वाघ शहरालगत असणाºया पोहरा-मालखेडच्या जंगलात दिसल्याने वन्यपे्रमी हरखून गेले आहेत. वनविभागाने अमरावती वनक्षेत्रात नव्याने दाखल झालेल्या 'नवाब'ला 'टी-२' असे नामानिधान दिले आहे. टी-२ पोहरा-मालखेड जंगलात मुक्त संचार करीत असून २० सप्टेंबर रोजी तो वनविभागाच्या ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. तोच वाघ एसआरपीएफ परिसरात काही दिवसांपूर्वी नागरिकांना आढळून आला होता. वडाळी परिसरात सुध्दा टी-२ चे दर्शन वनकर्मचाºयांना झाले आहे. आता टी-२ हा चक्क विद्यापीठाच्या मागील बाजूस असणाºया तलावावर काही नागरिकांना दृष्टीस पडला आहे. सोमवारी सकाळी काही नागरिकांना टी-२ विद्यापीठ परिसरातील तलावानजीक दृष्टीपथास पडला.
वनकर्मचारी तैनात
वाघ दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही.पडगव्हाणकर यांनी वनकर्मचाºयांसह विद्यापीठ तलावाची पाहणी केली. तथापि या भागात सर्वत्र गवत वाढल्याने वाघाच्या पायाचे ठसे नीट दिसू शकले नाही. तो वाघ तलावावर पुन्हा येण्याची शक्यता वनाधिकाºयांनी वर्तविली आहे. त्याअनुषंगाने आता या परिसरात वनकर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यांना सतत गस्त घालण्याची सूचना देण्यात आली आहेत.