जिल्ह्यात गाळमुक्त धरण उपक्रम
By admin | Published: May 14, 2017 12:13 AM2017-05-14T00:13:29+5:302017-05-14T00:13:29+5:30
जिल्ह्यात १८० हेक्टर सिंचन क्षमता असणारे तलाव, बंधारे आदीमधून लोकसहभागाने गाळ काढण्यात येणार आहे व हा गाळ शेतकऱ्यांना स्वखर्चाने वाहन खर्च करून शेतात टाकता येणार आहे.
जिल्हाधिकारी : लोकसहभागातून सुधारणार जमिनीचा पोत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १८० हेक्टर सिंचन क्षमता असणारे तलाव, बंधारे आदीमधून लोकसहभागाने गाळ काढण्यात येणार आहे व हा गाळ शेतकऱ्यांना स्वखर्चाने वाहन खर्च करून शेतात टाकता येणार आहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादन क्षमतेत वाढ होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
१०० हेक्टरच्या आत सिंचन क्षमता असणाऱ्या बंधाऱ्यामधून गाळ काढण्यासाठी ४८ तासांच्या आत संबंधित तलाठी किंवा तहसीलदार यांना कळवावे लागणार आहे. असे एकूण सिंचन विभागाचे ४४ व ईतर विभागाचे २३८ तलाव आहेत. तर १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या प्रकल्पामधील गाळ काढण्यासाठी तीन दिवसपूर्व संबंधित अधिकाऱ्यांना गाळ काढण्यासाठी कळवावे लागणार आहे. मात्र गाळ काढताना १०० हेक्टर सिंचन क्षेत्रातील तलावाच्या भिंतीपासून ५ मीटर अंतरात व २५० मीटर सिंचन क्षमता असणाऱ्या प्रकल्पाच्या भींतीपासून १० मीटर अंतरानंतर हा गाळ काढता येणार आहे. मात्र काही तलाव ईजीएसमधून तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मालकी हक्काचा वाद आहे. त्या ठिकाणी यंत्रणाद्वारा काळजी घेणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. मेळघाटात गाळ आहे. मात्र हे तलाव वनविभागाच्या अखत्यारित असल्याने येथील गाळ काढून वनजमिनीवरच टाकण्यात येणार आहे. या निमित्याने पानवठे पुनरूजिवीत करण्याचा प्रयत्न केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ८.४९ लाख वृक्षलागवडीचा लक्ष्यांक
जिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान ८ लाख ४९ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. लागवडीची प्रक्रिया शास्त्रोक्त व अत्याधुनिक पद्धतीची राहणार आहे. संबंधित जागेचे अंशास व रेखांश वनविभागाला देण्यात आले आहे. यासाठी ३१ मे पर्यंत खड्डे खोदण्यात येणार आहे. शासकीय व खासगी नर्सरीतून रोपे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे. कृषी विभागाद्वारा प्रामुख्याने फळपिकांची लागवड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.