रेशन दुकानदारांच्या अंगठ्यावरच मोफत धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:20+5:302021-05-06T04:13:20+5:30
अमरावती : राज्यभरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी एक मे पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत स्वस्त धान्य दिले जात आहे. ...
अमरावती : राज्यभरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी एक मे पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत स्वस्त धान्य दिले जात आहे. मात्र, त्यासाठी रेशन कार्डधारकाला ई-पास मशीनवर अंगठा लावणे आवश्यक राहणार आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. जिल्ह्यात हा निर्णय मागे घेण्यासाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला होता. ई-पास मशीनवर रेशन कार्डधारकांचा अंगठा घेण्याचा निर्णय अखेर शासनाने मागे घेतला. यामुळे सध्या सुरू असलेल्या पद्धतीनेच दुकानदारांचा अंगठा घेऊन मोफत धान्यवाटप केले जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गरीब व सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य शासनाने मोफत धान्यवाटपाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्य्रमंत्री गरीब कल्याण व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. याकरिता पात्र रेशन कार्डधारकांची संध्या ४ लाखावर आहे. येत्या मे आणि जून अशा दोन महिन्यांत शासनाने जाहीर केल्याप्रमाणे धान्य वितरित केले जाणार आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रेशन दुकानदारांनी धान्यवाटप करताना लाभार्थ्यांचा अंगठा घ्यावा लागणार असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त करीत दुकानदारांच्याच अंगठ्याने धान्य वितरणाची परवानगी द्यावी, रेशन दुकानदारांना विमा कवच लागू करावे व अन्य मागण्यांसाठी १ मे पासून संप पुकारला होता. अखेर शासनाने रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्यांची दखल घेतली. यानुसार दुकानदारांना स्वत:चे अंगठ्याने धान्य वितरणास परवानगी दिली आहे. याशिवाय अन्य मागण्यांबाबत सहानभूतीपूर्वक विचार केला जाणार असल्याचे लेखी पत्र रेशन दुकानदारांच्या संघटनेला दिले. त्यामुळे रेशन दुकानदारांनी आपला संप मागे घेतला असल्याचे अमरावती जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक वेलफेअर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितले.
बॉक्स
जिल्ह्यात रेशन कार्डधारकांचा अंगठा घेण्यास विरोध करीत काही दिवस रेशन दुकानदारांना धान्यवाटप बंद केले होते. परंतु, शासनाने हा निर्णय मागे घेतल्याने जिल्ह्यात मोफत धान्यवाटप सुरू केले आहे.
- अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी
कोट
कोरोना संकटाच्या संकटकाळात रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून रेशन कार्डधारकांना मोफत धान्यवाटप करीत आहेत. त्यात शासनाने कार्डधारकांच्या अंगठा घेणे बंधनकारक केले याला सर्व दुकानदारांनी विरोध केला. अखेर शासनाने हा निर्णय घेतला. यासोबतच अन्य मागण्यांबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन शासनाकडून मिळाले आहे.
- सुरेश उल्हे,
जिल्हाध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघ