उद्यापासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांचे मोफत वाटप!
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 5, 2024 11:35 PM2024-03-05T23:35:06+5:302024-03-05T23:35:21+5:30
होळीचा रंग होणार गडद : दोन दिवसांपूर्वीच तालुक्यांच्या गोदामात पोहोचले गठ्ठे
अमरावती : जिल्ह्यातील १,२७,४६५ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिवर्ष, प्रतिकुटुंब एक साडी रेशन दुकानातून मोफत मिळणार आहे. याबाबतचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे २५ जानेवारीला घेतला होता. प्रत्यक्षात साडीचे गठ्ठे दोन दिवसांपूर्वी तालुक्यांच्या गोदामात पोहोचले आहेत. त्यामुळे बुधवारपासून या मोफत साड्यांचे वाटप सुरू होणार असल्याने होळीचा रंग गहिरा होणार आहे.
कॅप्टिव्ह योजनेंतर्गत अंत्योदय रेशनकार्डधारक प्रत्येक कुटुंबाला ई-पॉस मशीनद्वारे एका साडीचे वाटप करण्यात येणार आहे. २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) ते २४ मार्च (होळी) या दरम्यान या मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात या साड्यांच्या गाठी (१०० साड्या/वजन ४१ ते ४६ किलो) दोन दिवसांपूर्वी संबंधित गोदामापर्यंत पोहोचल्या असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी दिली.
साठवणूक व हाताळणी करतांना साड्या खराब होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना पुरवठा विभागाने केलेली आहे. या योजनेसाठी शासनाने राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक केलेली आहे.
तालुकानिहाय लाभार्थी
पुरवठा विभागाच्या माहितीनुसार अचलपूर तहसील कार्यालयास ६५३८, अमरावती ५८९८, मोर्शी ८०४६, अंजनगाव सुर्जी ६१४४, भातकुली ४५९५, चांदूर रेल्वे ४०९३, चांदूरबाजार ८२९५ चिखलदरा २०३९५, दर्यापूर ६३७९, धामणगाव ५३५५, धारणी २६,०२६, नांदगाव ५२३९, तिवसा ४३०१, वरुड ८२१८ व अमरावती एफडीओ कार्यालयास ७९४३ साड्या वाटपाचे उद्दिष्ट आहे.
रेशन नेण्यासाठी सरकारी पिशवी पोहोचलीच नाही
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना १० किलोची क्षमता असलेली एक पिशवी रेशन दुकानातून मोफत देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने ८ जानेवारीला स्पष्ट केले होते. सहा महिन्यांच्या अंतराने एक पिशवी अशी ही योजना आहे. देण्यात येणाऱ्या या पिशव्यांचा ठावठिकाणाच नसल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील प्रत्येक अंत्योदय कुटुंबास रेशन दुकानातून बुधवारपासून एक साडी मोफत मिळेल. साड्यांचे गठ्ठे सर्व तालुक्यांना पोहोचले आहेत.
- प्रज्वल पाथरे
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी