परतवाड्याच्या ३८ डॉक्टरांकडून विनामूल्य आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:36+5:302021-06-18T04:09:36+5:30

परतवाडा : कोरोना संकटकाळात ग्रामीण भागात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असावी व तेथील रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत ...

Free healthcare from 38 returning doctors | परतवाड्याच्या ३८ डॉक्टरांकडून विनामूल्य आरोग्यसेवा

परतवाड्याच्या ३८ डॉक्टरांकडून विनामूल्य आरोग्यसेवा

googlenewsNext

परतवाडा : कोरोना संकटकाळात ग्रामीण भागात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असावी व तेथील रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून परतवाडा-अचलपुरातील ३८ डॉक्टरांनी सामाजिक सद्भावना मंच स्थापन केला. त्याद्वारे गोरगरीब रुग्णांना विनामूल्य आरोग्यसेवा देणे सुरू केले असून, हा उपक्रम खेड्यापाड्यांतील लोकांना दिलासा देणारा ठरला आहे.

टाळेबंदीच्या काळात शहराच्या ठिकाणी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पोहोचण्यासाठी अनेक अडचणी होत्या. काही रुग्णांना वेळेवर उपचार मिळू न शकल्याने प्राणही गमवावे लागण्याचे प्रसंग घडतात. अशा परिस्थितीची जाण ठेवून सामाजिक बांधिलकीपोटी अचलपूर येथील ३८ डॉक्टरांनी सामाजिक सद्भावना मंच स्थापन करून विनामूल्य रुग्णसेवा सुरू केली. या कार्याचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

परतवाडा येथील डॉ. राम ठाकरे यांनी या संस्थेची स्थापना केली असून, ग्रामीण भागातील गरीब, गरजू रुग्णांना तत्पर वैद्यकीय सुविधा मिळावी हा त्यामागचा हेतू आहे. मागील दीड वर्षापासून टाळेबंदीमुळे रोजगाराची साधने कमी झाल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. पैशाअभावी गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार घेता न आल्यामुळे प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी संवेदनशीलता बाळगून उत्स्फूर्तपणे एकत्र येत हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

* * * * पैसे नसल्याने वेळेवर औषधोपचार करता आला नाही

‘जवळ पैसे नव्हते. म्हणून वेळेवर औषधोपचार करता आला नाही’ अशी एका वयोवृध्द आजीबाईंची व्यथा ऐकताच डॉ. ठाकरे हेलावून गेले. हा प्रसंगच या उपक्रमाला जन्म देणारा ठरला. त्यांनी याबाबत समविचारी डॉक्टर मित्रांशी चर्चा केली. यातूनच विनामूल्य वैद्यकीय सेवेची संकल्पना पुढे आली. सामाजिक सद्भावना मंचाच्या माध्यमातून ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हे अभियान आता गावागावांत राबविण्यात येत आहे. या अभियानात डॉ. ठाकरे यांच्या हाकेला साद देत सुरुवातीला ३० फिजीशियन डॉक्टरांनी सहभाग नोंदविला आणि रुग्णसेवा करण्यासाठी सज्ज झाले. यानंतर आणखी ८ डॉक्टर अभियानात सहभागी झाले. सद्यस्थितीत एकूण ३८ डॉक्टर्स त्यांची वैद्यकीय सेवा देऊन रुग्णसेवा करीत आहेत.

आमच्या टीममधील प्रत्येक डॉक्टरांचे स्वत:चे क्लिनीक आहे. क्लिनीकचे काम आटोपून दुपारी ३ ते सायंकाळी ७ दरम्यान सर्व डॉक्टर त्यांच्या नियोजित गावी पोहोचत विनामूल्य रुग्णसेवा करतात. त्यामुळे गावातील रुग्णांचा शहरात येण्याजाण्याचा खर्च व डॉक्टरांची फी दोन्ही पैशांची बचत होत आहे.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *उपक्रमात विविध तज्ज्ञांचा समावेश

१ जूनपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून जीवाची पर्वा न करता निःस्वार्थ भावनेने सर्वजण एक होऊन रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून वैद्यकीय सेवा देत आहेत. पहिल्या दिवशी ३० डॉक्टरांच्या पथकाने अचलपूर तालुक्यातील चमक, बोर्डी, नायगाव या गावांत आपली वैद्यकीय सेवा देत रुग्णांची तपासणी केली. वैद्यकीय तपासणी, आजारावर उपचारासह मोफत औषधेही रुग्णांना त्यांच्याकडून देण्यात येत आहेत. या समूहात अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, डोळ्यांचे तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. दहा बारा दिवसांत जवळपास २५ गावांत विनामूल्य सेवा या खासगी डॉक्टरांनी दिली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *मेळघाटातही सेवेचा संकल्प

आगामी काळात मेळघाटात आरोग्यसेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. मेळघाट हा डोंगराळ अतिदुर्गम असा भाग असून तेथील आदिवासीबहुल गावांना आरोग्य सेवेची खरी गरज आहे. अचलपूर तालुक्यात सेवा दिल्यावर मेळघाटातील कुपोषण व अंधश्रध्दा निर्मूलन या दोन प्रश्नांवर काम करण्यासह तेथील दुर्गम गावांत जाऊन वैद्यकीय सेवा देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

* * * * * * * * * * * * *उपक्रमासाठी अनेक डॉक्टर उत्स्फूर्तपणे पुढे आले

गरीब रुग्णांना त्यांच्या गावातून परतवाडा येथे पोहोचायला खर्च लागतो. त्यामुळे आपणच त्यांच्या गावाला जाऊन आरोग्य शिबिर घेऊन आरोग्यसेवा देऊ, असे सर्वानुमते ठरविले. त्यानुसार आम्ही त्या गावात गेलो. गावकऱ्यांकडून आदर, प्रेम आम्हांला मिळते. त्याहून मोठे समाधान दुसरे नाही. त्यामुळे हा उपक्रम सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी आमचाही निश्चय दृढ झाला. त्यामुळे आमच्या डॉक्टर मंडळींमध्ये प्रत्येकाला ग्रामीण भागात जाऊन तेथील रुग्णांची सेवा करावी असे वाटत आहे, असे मंचाचे अध्यक्ष डॉ. राम ठाकरे यांनी सांगितले.

* * * * * * * * * * * * *सामाजिक सद्भावना मंचाचे आरोग्य सेवेकरी

डॉ. राम ठाकरे (अध्यक्ष), डॉ. मो. अनिस (उपाध्यक्ष), डॉ. समी उल्हा (उपाध्यक्ष), डॉ. अमोल मळसने (कोषाध्यक्ष) डॉ. प्रणय उताणे (संघटक), डॉ. सचिन गावंडे, डॉ .चेतन बीसने, डॉ. रवींद्र खाजुरकर, डॉ. अमोल चिंचोळे, डॉ. मो. फरहान, डॉ. श्रीकृष्ण घुटे, डॉ. मो. असिफ शेख, डॉ. प्रवीण मुरले, डॉ. राहुल रोडे, डॉ. स्वप्नील भेले, डॉ. मदनजी बीसने, डॉ.अमोल बैस, डॉ. यासीन शेख, डॉ. हेमंत मसने, डॉ. आशय डांगरे, डॉ. निखिल इंगळे, डॉ. दिनेश केचे, डॉ. अतुल ढोरे, डॉ. प्रवीण खालोकर, डॉ. व्ही. एन. कविटकर, डॉ. सय्यद वसीम, डॉ. राहुल नगराळे, डॉ. मोहसीन खान, डॉ. भूषण अडगोकर, डॉ. सुहास शहाणे, डॉ. सदनादजी भगत, डॉ. संजय तट्टे, डॉ. अमोल व-हेकर.

0000

Web Title: Free healthcare from 38 returning doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.