मोफत तांदळाची लाभार्थींकडून खुल्या बाजारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:46+5:302021-08-20T04:17:46+5:30
संजय खासबागे - वरूड : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता ...
संजय खासबागे - वरूड : शासनाकडून गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य दुकानदारांकडून खुल्या बाजारात विकले जात असल्याची ओरड असताना आता लाभार्थीच तीन रुपये किलोने मिळणारे तांदूळ प्रतिकिलो १० ते १५ रुपये दराने खुल्या बाजारात विकत आहेत. याकरिता व्यापाऱ्यांचे दलाल गल्लोगल्ली फिरून रेशनचा तांदूळ खरेदी करीत आहेत. भंडारा, गोंदिया येथे नेऊन हेच व्यापारी फिल्टर केलेला तांदूळ परत ३० ते ३५ रुपये दराने बाजारात ग्राहकांना विकत असल्याचे वास्तव आहे. तालुक्यातून महिन्याकाठी एक ते दोन ट्रक तांदळाची तस्करी होत असते. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.
कोरोनाकाळात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्यात येते. अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गतसुद्धा धान्यवाटप केले जात आहे. तालुक्यात १२४ रास्त भाव प्राधिकृत दुकानदार, तर रेशन कार्डधारकांमध्ये अंत्योदय योजनेचे ८ हजार १७२, प्राधान्य गटाचे २३ हजार ८९२ आणि एपीएल १३ हजार ९३९ आहेत. त्रुटीयुक्त ३,९५६ कार्ड आहेत. अंत्योदय योजनेतील कुटुंबाला ३५ किलो मोफत धान्यात १५ किलो तांदूळ आणि २० किलो गहू मिळतो. प्राधान्य गट योजनेमध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत मिळते.
गोरगरिबांनी नेलेला तांदूळ, गहू खरेदी करणार रॅकेटच सक्रिय असून, १० ते १५ रुपये दराने तांदूळ खरेदी करणारे दलाल गल्लोगल्ली फिरून खरेदी करीत आहेत. साधारणतः एक दलाल एक ते दोन क्विंटल तांदूळ खरेदी करून व्यापाऱ्याला विकतो. व्यापारी या फिरस्त्या दलालांकडून घेतलेला तांदूळ ट्रकने भंडारा गोंदियाकडे रवाना करतो. फिल्टर करून तोच तांदूळ एक तर शासनाला विकला जातो किंवा खुल्या बाजारात ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात आहे. खुद्द रेशन दुकानदारसुद्धा ग्राहकांना अंगठा लावण्याकरिता बोलावून त्याला काही पैसे रोखीने देऊन तांदूळ स्वतः व्यापाऱ्यांच्या घशात घालत असल्याची चर्चा आहे. काही जणांचे रेशन कार्ड त्यांच्याकडेच आहे. यामध्ये मोठे व्यापारी गुंतलेले असताना या काळ्या बाजाराला आळा कोण घालणार, तांदळाच्या तस्करीच्या मुळापर्यंत जाण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रेशनच्या धान्याचा काळ बाजार थांबविण्याची काळाची गरज होऊन रेशनच्या धान्याची लूट थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
--------------
दुचाकीवर ग्रामीण भागात तांदळाची खरेदी करणारे सक्रिय !
ग्रामीण आणि आता शहरी भागात दुचाकीवरून ''तांदूळ द्या हो तांदूळ'' म्हणणारे दलाल जरी पोटासाठी कमवित असले तरी व्यापारी कोट्यधीश होऊन शासनाच्या योजनेला सुरुंग लावत आहेत.
-------------------