१६० रुग्णांना प्लाझ्मा, ३०० जणांना ऑक्सिजनचा मोफत पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:12+5:302021-03-08T04:13:12+5:30
धामणगाव रेल्वे : कोरोनाकाळात ज्या गरीब रुग्णाच्या मदतीला कोणीही नाही, खिशात एक रुपया नाही, अशा रुग्णांच्या मदतीसाठी धावणाऱ्या ऑक्सिजन ...
धामणगाव रेल्वे : कोरोनाकाळात ज्या गरीब रुग्णाच्या मदतीला कोणीही नाही, खिशात एक रुपया नाही, अशा रुग्णांच्या मदतीसाठी धावणाऱ्या ऑक्सिजन फाउंडेशनच्या पुढाकाराने आठ महिन्यांत १६० रुग्णांना प्लाझ्मा, तर ३०० जणांना ऑक्सिजनचा मोफत पुरवठा करण्यात आला.
समाजसेवेचे व्रत हाती घेऊन कोरोनाकाळात उच्चशिक्षित असलेल्या जिल्ह्यातील २५ युवकांनी ऑक्सिजन फाउंडेशन नावाची सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यांनी जवळपास १६० रुग्णांना प्लाझ्मा देऊन त्यांना बरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तसेच गरजूंना मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य व इतर जीवनावश्यक गोष्टींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला. प्लाझ्मा थेरपीचे अनमोल कार्य फक्त अमरावती शहरापुरते मर्यादित न ठेवता हे पुणे, नाशिक, दिल्ली, गाझियाबाद, मध्य प्रदेश, नागपूर या शहरांमध्येदेखील या युवकांनी केले. तीनशे रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर व रुग्णवाहिका मोफत दिली. ह्रदयविकाराने ग्रासलेल्या मुलीसाठी त्यांनी रक्तदान केले. माया यादव या कर्करोगाशी लढत असलेल्या गृहिणीवर कोरोना संसर्गित समजून अयोग्य असे उपचार केले जात होते, परंतु ऑक्सिजन फाऊंडेशनने योग्य वेळी त्यांची सुटका करून कर्करोगाशी निगडित उपचार त्यांच्यावर सुरू केले. शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आठशे जणांनी रक्तदान केले.
कोट
भुकेल्यांना अन्न, रक्ताची गरज असलेल्यांना रक्तदान तसेच ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देणे, शिवाय घरापासून दुरावलेल्यांना घर मिळवून देऊन प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होत आहोत.
- वेदांत कडू, ऑक्सिजन फाऊंडेशन, अशोकनगर, धामणगाव रेल्वे