७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:07+5:302021-08-12T04:17:07+5:30
मोर्शी : ७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा, अशी मागणी करीत १० ऑगस्ट रोजी भारतीय जनता ...
मोर्शी : ७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करून तालुका ड्रायझोनमुक्त करा, अशी मागणी करीत १० ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सदस्य तथा भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांच्या नेतृत्वात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उपजिल्हाधिकाऱ्यांना यावेळी लेखी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत लाखो रुपये खर्च करून पिंपळखुटा (मोठा) येथील ७० गावे पाणीपुरवठा योजना अमलात आणली. ही योजना काही दिवसांनंतर जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून घेतली. काही वर्षांनंतर या योजनेला नियोजनाअभावी ग्रहण लागले. पिण्याच्या पाण्याचे विद्युत देयक थकीत झाल्यामुळे ही योजना बंद पडली. याकडे लक्ष वेधण्यासाठी १० ऑगस्ट रोजी अमरावती येथील इर्विन चौकातून कमलसिंह चितोडिया व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या ३०० कार्यकर्त्यांचा पैदल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. तेथे कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ७० गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू होईल, असे आश्वासन दिले.