नऊ वीरपत्नींना मोफत प्रवास सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:50 PM2018-05-02T23:50:22+5:302018-05-02T23:50:32+5:30
देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या पत्नींचा राज्य परिवहन महामंडळाने अनोख्या पद्धतीने सन्मान केला. महाराष्ट्र दिनापासून वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या पत्नींचा राज्य परिवहन महामंडळाने अनोख्या पद्धतीने सन्मान केला. महाराष्ट्र दिनापासून वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ वीरपत्नींना मंगळवारपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनांतर्गत मोफत प्रवास पासचे वितरण महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पठारे व विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सुनीता प्रभाकर म्हसांगे, कांताबाई शंकर सांगोले, रेणुका प्रकाश धांडे, सरस्वती ओंकार मासोदकर, इंदुमती तेजराव दंदी यांना एका समारंभात पासचे वितरण करण्यात आले.
अधिकारी पोहोचले लाभार्थींच्या घरी
प्रातिनिधिक स्वरूपात पाच जणींना मंगळवारी ओळखपत्र देण्यात आले. गुंफाबाई मुरलीधर कोलसाईत, नूतन नंदकिशोर खांडेकर, वनमाला रामदास गेठे, मनू सुनील चौहान या उर्वरित लाभार्थींना घरी जाऊन सन्मानपूर्वक ओळखपत्र देत असल्याची माहिती श्रीकांत गभने यांनी दिली.