जिल्ह्यात १० हजार रुग्णांवर पाच लाखांपर्यंत होणार मोफत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:14 IST2024-07-01T13:10:16+5:302024-07-01T13:14:43+5:30
आयुष्मान कार्ड गरजेचे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश

Free treatment up to 5 lakh will be given to 10 thousand patients in the district
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेमध्ये पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही पाच लाखांपर्यंत आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ११ हजार ७७८ रेशन कार्डधारकांना दिलासा मिळाला आहे, शिवाय या योजनेत यंदाच्या सहा महिन्यांत १० हजार रुग्णांना लाभ मिळाला आहे.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या योजनांची सांगड घालून या योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यापूर्वी पिवळे व केशरी कार्डधारकांचाच समावेश होता. आता पांढऱ्या रेशन कार्डधारक कुटुंबांचाही समावेश केला आहे. आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करणे आवश्यक आहे. पांढरे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करून शासनाचा १२ अंकी नोंदणी क्रमांक घ्यावा लागणार आहे. नोंदणी झाल्यानंतरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांसाठी ही योजना होती. या योजनेमध्ये सर्व कार्डधारकांचा समावेश करावा, अशी नागरिकांची मागणी होती. या आठवड्यात या योजनेच्या अंमलबजावणीचे आदेश शासनाने दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
'या' रेशन कार्डधारकांनाही मिळणार लाभ
• जिल्ह्यात ११७६८ पांढरे रेशन कार्डधारक आहेत. यामध्ये अचलपूर तालुक्यात ७६९, अमरावती ३०५, मोर्शी १२७०, अंजनगाव सुर्जी ६२५, भातकुली ४८४, चांदूर रेल्वे ५३३, चांदूर बाजार ११२६, चिखलदरा ३०८, दर्यापूर ११८३, धामणगाव रेल्वे ४०, नांदगाव खंडेश्वर ४८१, तिवसा २८, वरूड २४२ व अमरावती कार्यालयात ३३६२ पांढरे रेशन कार्डधारक आहे. यांनाही आता पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील.
पाच लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
● योजनेत प्रत्येक कुटुंबाला १.५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण होते. आता दरवर्षी ते पाच लाखांपर्यंत करण्यात आले आहे. यामध्ये मूत्रपिंड
शस्त्रक्रियेसाठी २.५० लाखांची मर्यादा आता ४.५० लाखांपर्यंत करण्यात आली.
● योजनेत मागणी नसलेले १८१ उपचार वगळले आहेत व मागणी असलेल्या ३२८ नवीन उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे
योजनेत उपचारांची संख्या १३५६ एवढी झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
● आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत पाच लाखांपर्यंतचे उपचार प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दिले जातात. त्याचाही लाभ रुग्णांना मिळत आहे.
या सर्वांना मिळणार लाभ
• गट अ पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केसरी (१ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिकाधारक कुटुंबे.
• गट ब : अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका या योजनेचे आता लाभार्थी आहेत.
• गट क : विविध आश्रमांतील विद्यार्थी अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील नागरिक, बांधकाम कामगार व शासनाद्वारा सूचित करण्यात आलेल्या निकषातील लाभार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सहा महिन्यांत ९९२४ रुग्णांवर मोफत उपचार
• यंदाच्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील ९९२४ रुग्णांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार या सुविधेचा लाभ मिळाला आहे.
• यामध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा समावेश आहे.
• या योजनेंतर्गत गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णांना या आरोग्य सुविधेचा लाभ मिळाला आहे.
"रुग्णांना या योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहे. मागील सहा महिन्यांत ९९२४ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावेत."
- डॉ. अंकिता मटाले, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले व आयुष्मान भारत योजना