सर्कशीतील प्राण्यांची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:28 PM2018-09-10T23:28:16+5:302018-09-10T23:28:45+5:30
अमर सर्कशीतील प्राण्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशील दखलीनंतर अत्याचारातून मुक्तता झाली. सर्व प्राण्यांना वर्धा येथील पीपल फॉर अॅनिमल यांच्या स्वाधीन करण्यात आले असून, प्राणिप्रेमी संघटनांच्या या लढ्याला यश मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमर सर्कशीतील प्राण्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशील दखलीनंतर अत्याचारातून मुक्तता झाली. सर्व प्राण्यांना वर्धा येथील पीपल फॉर अॅनिमल यांच्या स्वाधीन करण्यात आले असून, प्राणिप्रेमी संघटनांच्या या लढ्याला यश मिळाले आहे.
अमरावती शहरातील सायंस्कोर मैदानात अमर सर्कस सुरू होती. दरम्यान, जागेच्या भाड्याच्या वादानंतर अमर सर्कसविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सर्कस बंद पडल्यानंतर तेथील प्राण्यांची दैनावस्था असल्याचे प्राणिप्रेमी संघटनांच्या निदर्शनास आले. इंद्रप्रताप ठाकरे यांच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांनी पुन्हा सर्कस मालकाविरुद्ध प्राणी क्रूरता कायदा १९६० नुसार गुन्हा नोंदविला. तक्रारीनंतर जखमी प्राण्यांना अत्यंत वाईट अवस्थेत उघड्यावर ठेवत असल्याचे प्राणिप्रेमींच्या लक्षात आले. त्यांनी प्राण्यांना सुरक्षितस्थळी ठेवण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या. या प्राण्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कुठे ठेवावे, हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी वर्धा येथील पीपल फॉर अॅनिमलद्वारा संचालित करूणाश्रमात प्राण्यांना ठेवण्यासाठी शिफारस पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आली. यावरून जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी त्वरित निर्णय घेऊन सदर प्राणी न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत वर्धा येथे ठेवण्याची परवानगी दिली.
रविवार सर्व प्राण्यांना पोलीस संरक्षणात सर्कस मालकाच्या तावडीतून सोडवून वर्धा येथील पीपल फॉर अनिमलचे संचालक आशिष गोस्वामी यांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्राण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाच दिवस ठिय्या
जखमी प्राण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सेंटर फॉर अनिमल रेस्क्यू अँड रिसर्च (कार्स ), जीवनरक्षा बहुद्देशीय संस्था, स्टँडिंग फॉर टायगर्स, द्राक्षवेल बहुद्देशीय संस्था, रक्षक वन्यजीव संरक्षण व बहुद्देशीय संस्था, वसा संस्था, अरण्यम बहुद्देशीय संस्था, वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसेर्च अँड रेस्क्यू आॅर्गनायझेशन यांनी पुढाकार घेतला. या संस्थांचा प्रशासकीय लढा महत्त्वाचा ठरला. विविध संस्थांच्या ५० पदाधिकारी व सदस्यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्राण्यांच्या मुक्ततेकरिता पाच दिवस ठिय्या देऊन एकोप्याचे व प्राण्यांप्रति असलेल्या संवेदनशीलतेचे उदाहरण दिले.
प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंधासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात यावी, याकरिता प्राणिमित्रांची शासकीय कृती समिती स्थापन करण्याची गरज आहे.
- सागर मैदानकर
आॅनररी अॅनिमल वेलफेअर आॅफीसर