स्वातंत्र्य संग्राम सेनानी रामकृष्ण खेरडे कालवश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 07:18 PM2020-02-09T19:18:01+5:302020-02-09T19:18:33+5:30
रामकृष्ण खेरडे यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात संचारबंदी असताना हातात राष्ट्रध्वज घेऊन असहकार आंदोलन केले होते.
अमरावती - येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी रामकृष्ण खेरडे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. सनुनंदा खेरडे, मुलगी नीलिमा उमप, जावई व नातवंड असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामकृष्ण खेरडे यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात संचारबंदी असताना हातात राष्ट्रध्वज घेऊन असहकार आंदोलन केले होते. मोर्चाचे नेतृत्व करताना 'वंदे मातरम्, इंग्रज चले जाव'चे नारे लावल्याने इंग्रज सेनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात त्यांनी ४ महिने तुरुंग्वासात भोगला. त्यांनी बी.ए.बी.टी., एल.एल.बी.चे शिक्षण त्या काळात पूर्ण केले.
१९७८ पासून त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी संघटनेचे नेतृत्व केले. प्रशासनात उपशिक्षणाधिकारी राहिलेत. हैद्राबाद राज्यातील निजामकालीन अत्याचार व अन्यायाचा निषेध करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. सोनेरी नावाची संघटना त्यांनी स्थापन केली होती. वाचनालय व केदार व्यायाम मंदिराचीही स्थापना त्यांनी केली होती. साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलात आणि दादा धर्माधिकारी यांच्या राष्ट्रीय युवक संघटनेत त्यांनी प्रभावी कार्य केले.