धामणगावच्या स्वातंत्र्य सेनानींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भोगला सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:15 AM2021-08-15T04:15:38+5:302021-08-15T04:15:38+5:30
महात्मा गांधी ची सुगनचंद लुनावत यांनी घेतली होती प्रेरणा मोहन राऊत धामणगाव रेल्वे : महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ ...
महात्मा गांधी ची सुगनचंद लुनावत यांनी घेतली होती प्रेरणा
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ चळवळीत उडी घेत धामणगावातील स्वातंत्र्य सेनानींनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. नागपुरात सहा महिने शिक्षा भोगताना अनंत यातना सहन केल्या. त्यांचे स्मरण स्वातंत्र्यदिनी तालुकावासीयांच्या रोमरोमात जाज्वल्य देशभक्तीचे स्फूरण चढविते.
स्वातंत्र्यपूर्व काळात लाखो देशबांधवांनी दिलेल्या बलिदानाच्या पायाभरणीवर स्वातंत्र्याची इमारत उभी आहे. सारे देशभक्त ‘जिंकू किंवा मरू’ या प्रेरणेने लढायला तयार झाले. यात विद्यानगरी म्हणून लौकिकप्राप्त धामणगाव नगरीदेखील मागे नव्हती. सुगनचंद लुणावत, अंबादास भेंडे, बाबासाहेब अंदुरकर, अमरसिंह ठाकूर, नारायण इंगळे, गुलाबराव झाडे यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सेनानी या नगरीत होऊन गेले. सुगणचंद लुणावत हे महात्मा गांधींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने लढा उभारत असताना सन १९४१ मध्ये त्यांना अटक झाली होती. नागपूर येथील तुरुंगात १२ जानेवारी ते २२ जून १९४१ पर्यंत सहा महिने ठेवण्यात आले. त्यांना तेथे अंबाडीचे बेत तयार करण्याचे काम देण्यात आले होते. लुणावत हे महात्मा गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे आमदारकीचा राजीनामा देऊन स्वतंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या सोबतीने स्वातंत्र्याकरिता लढा दिला होता. त्याच काळात कावली वसाड येथील स्वातंत्र्य सेनानींनी इंग्रजांविरुद्ध मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यावेळी गुलाबराव झाडे, नारायण इंगळे यांना अटक झाली होती.
धामणगाव तालुक्यातील १०९ सैनिक करतात भारतमातेचे रक्षण
तालुक्यातील युवकांनी स्वातंत्र्योत्तर काळातही देशासाठी योगदान दिले आहे. तालुक्यातील दोन जवान शहीद झाले, तर १०९ सैनिक तिन्ही दलांमध्ये तैनात आहेत. सावळा, निंबोली, शेंदूरजना खुर्द ही गावे आजही सैनिकांची गावे म्हणून ओळखली जातात. जळगाव आर्वीसारख्या दोन हजार लोकसंख्येच्या या गावातील स्वप्निल क्षीरसागर हा २० वर्षाचा युवक देशसेवा करीत आहे. धामणगाव शहरात ११, तर मंगरूळ दस्तगीर येथील आठ सैनिक आहेत. काशीखेड, आसेगाव, निंभोरा बोडका, वरूड बगाजी, ढाकुलगाव, रायपूर कासरखेड, वकनाथ, नारगावंडी, बोरगाव निस्ताने, पिंपळखुटा, झाडगाव, वाढोणा येथील अनेक जवान सैन्यदलात सामील होऊन भारतमातेची सेवा करीत आहेत.