स्वातंत्र्य संग्राम सेनानी लक्ष्मणबुवा कदम कालवश, ७० वर्षे अव्याहत जनजागृती, लोकमतनेही केला होता गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 05:09 PM2017-12-04T17:09:31+5:302017-12-04T17:59:25+5:30
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी व राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातकीर्त लक्ष्मणबुवा माधवजी कदम (ब्रह्मभट्ट) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी व राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातकीर्त लक्ष्मणबुवा माधवजी कदम (ब्रह्मभट्ट) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य चळवळतील एक तारा निखळला आहे.
वयाच्या १८ व्या वर्षांपासूनच श्रोत्यांना तासन्तास खिळवून ठेवून कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे लक्ष्मणबुवा हे या तालुक्याचे भूषण होते. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, कैकाडी महाराज या महापुरुषांचा सहवास लाभला होता. संतांचा उपदेश तसेच सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विषय निवडून कीर्तनाच्या माध्यमातून ७० वर्षे त्यांनी जनजागृतीचे अव्याहत कार्य केले. महाराष्ट्रातील गावागावांत त्यांनी हजारो कीर्तने केली. अन्य राज्यातही त्यांची कीर्तन झालीत. २००१ साली लोकमतच्या त्रिदशकपूर्ती सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना गौरवान्वित करण्यात आले होते. गेल्या चार वर्षांपासून प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांनी कीर्तनाला विराम दिला. सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी इंदिरा, मुलगा शरद, सीमा व वनिता या मुली, सुना व नातवंडं असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. शासनाच्यावतीने तहसीलदार मनोज लोणारकर यांनी पुष्पचद्र वाहून श्रद्धांजली दिली. त्यांच्या पार्थिवावर नांदगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले.
असे मेले कोट्यांकोटी, काय रडू लेकासाठी ?
२००४ साली चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावातील कीर्तनादरम्यान त्यांना मुलगा नीलेश यांच्या मृत्यूची वार्ता मिळाली. त्यांनी कीर्तन न थांबविता ते पूर्ण करूनच जाऊ, असा निश्चय केला. त्यांनी या कीर्तनात ह्यअसे मेले कोट्यांकोटी, काय रडू लेकासाठी? असे म्हणत कीर्तन पूर्ण केल्याची आठवण याप्रसंगी त्यांच्या ओळखीतल्या अनेकांनी जागविली.