इर्विनच्या शवविच्छेदनगृहातील फ्रीजर, वातानुकूलित यंत्र बंद; मृतदेहांवर अळ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 01:44 PM2022-05-09T13:44:06+5:302022-05-09T13:57:31+5:30

फ्रीजर आणि एसी दोन्ही बंद असल्याने मृतदेह अधिक काळ शवविच्छेदनगृहात ठेवणे कठीण झाले असून, मृतदेहातून येणारा दुर्गंध येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

Freezer in Irwin hospital morgue, air conditioner are off; Larvae on corpses | इर्विनच्या शवविच्छेदनगृहातील फ्रीजर, वातानुकूलित यंत्र बंद; मृतदेहांवर अळ्या!

इर्विनच्या शवविच्छेदनगृहातील फ्रीजर, वातानुकूलित यंत्र बंद; मृतदेहांवर अळ्या!

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागात नेमके चालले काय?वरिष्ठांचे दुर्लक्ष; नातेवाइकांना नाहक मनस्ताप

उज्वल भालेकर

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील शवविच्छेदन गृहातील मृतदेह ठेवण्यासाठी असलेले फ्रीजर हे तब्बल तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून येथील रुग्णालय प्रशासन एसी रूमचा वापर करीत होता. परंतु, या रूममधील एसीदेखील आठ दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार उघड झाला आहे. फ्रीजर आणि एसी दोन्ही बंद असल्याने मृतदेह अधिक काळ शवविच्छेदनगृहात ठेवणे कठीण झाले असून, मृतदेहातून येणारा दुर्गंध येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

फ्रीजर, एसी बंद

जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघात, आत्महत्या, तसेच विविध आजारांनी मृत्यू झालेले रुग्णांचे मृतदेह हे विच्छेदन गृहात ठेवले जातात. अनेकवेळा काही मृतदेह हे अनोळखी असल्याने त्याची ओळख होईपर्यंत एक ते दोन दिवस हे मृतदेह शवविच्छेदन गृहातच ठेवले जातात. त्यामुळे या ठिकाणी चार मृतदेह ठेवता येईल असा एक, तर प्रत्येकी दोन मृतदेह ठेवता येतील असे तीन फ्रीजर आहेत. त्याचबरोबर एक एसी रूम आहे, ज्या ठिकाणी एकाच वेळी आठ ते नऊ मृतदेह ठेवण्यात येतात. परंतु, येथील सर्वच फ्रीजर हे मागील तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून आहेत. तर, रुममधील दोन्ही एसी हेदेखील आठ दिवसांपासून बंद पडले आहेत.

दुर्गंधीमुळे कर्तव्य बजावणे कठीण

शवविच्छेदनगृहातील वातानुकूलित यंत्र बंद असल्याने मृतदेहांवर अळ्या पडत असल्याचे चित्र आहे. दोन ते तीन दिवस लोटले की, मृतदेहातून दुर्गंधी येणे सुरू होते. मृतदेहातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे अधिकारी व कर्मचारी येथे नियमित कर्तव्यासाठी चालढकल करीत आहेत.

शवविच्छेदनगृहातील फ्रीजर बंद आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून येथील एसी रूममध्ये मृतदेह ठेवले जात आहेत. परंतु, या रुमधील एसी बंद पडले. एसी दुरुस्तीसाठी बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क केला आहे.

- डॉ. नरेंद्र साळुंके, आरएमओ, जिल्हा सामान्य रुग्णालय

Web Title: Freezer in Irwin hospital morgue, air conditioner are off; Larvae on corpses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.