शुक्रवारी ६५१ कोरोना संक्रमित, तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:03+5:302021-03-06T04:13:03+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. शुक्रवारी पुन्हा ६५१ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून, तिघांचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्याची ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. शुक्रवारी पुन्हा ६५१ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून, तिघांचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. आतापर्यत बाधितांची आकडेवारी ३८४४७ एवढी झाली असून, मृत्युसंख्या ५५२ वर पोहोचली आहे. कोरोना संक्रमितांचा आलेख पाहिजे तसा कमी होताना दिसून येत नाही, हे विशेष.
कोरोना संक्रमितांची वाढती आकडेवारी लक्षात घेता यापूर्वी जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपर्यंत संचारबंदी घोषित केली होती. मात्र, शनिवारपासून संचारबंदीत शिथिलता आणली असून, सकाळी ९ ते ४ या दरम्यान सर्व दुकाने, आस्थापना सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल शुकवारी जारी केले आहेत. अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका हद्दीत वाढणारा कोरोना रोखण्यासाठी संचारबंदी घाेषित करण्यात आली होती. परंतु, नागरिकांनी कोरोना नियमांवलीचे पालन केले नाही. परिणामी बाधितांची आकडेवारी जैथे थे आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत शिथिलता आणून नागरिकांना दिलासा दिल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार,आतापर्यत ३८४४७ एवढी कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. तर १३४० रूग्ण उपाचारासाठी रूग्णालयात दाखल आहेत. शुक्रवारी २४० रूग्ण कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतले आहे. आतापर्यत ३०७४९ एवढे रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात ४०२१ तर ग्रामीणमध्ये १७८५ रूग्ण आहेत. ॲक्टिव्ह रूग्ण ७१४६ असून, रिकव्हरी रेट ७९.९८ एवढा आहे. डब्लिंग रेट ३७ असून, मृत्यू दर १.४४ टक्के आहे. एकूण नमुने २ लाख ३७ हजार ४९३ आहे.