मित्राचा मेसेज करू शकतो फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:09 PM2019-02-03T23:09:06+5:302019-02-03T23:09:55+5:30
अमरावतीकरांच्या मोबाईलवर सध्या एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केल्याचा तो संदेश आहे. मात्र, या संदेशातील इंटरनेट लिंकवर आपण संपर्क केल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध रहा, या संदेशानंतर काही दिवसांत अनोळखी क्रमांकांवरून कॉल आल्यास ओटीपी शेअर करू नका, आपल्या बँक खात्याविषयी माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावतीकरांच्या मोबाईलवर सध्या एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केल्याचा तो संदेश आहे. मात्र, या संदेशातील इंटरनेट लिंकवर आपण संपर्क केल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध रहा, या संदेशानंतर काही दिवसांत अनोळखी क्रमांकांवरून कॉल आल्यास ओटीपी शेअर करू नका, आपल्या बँक खात्याविषयी माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलवर बीडब्ल्यूजीएफवायएनडी यांच्याकडून संदेश प्राप्त होत आहे. तुमचा मित्र एक्सवायझेडने तुमच्यासाठी एक हजार रुपये एफवायएनडीमध्ये जमा केले आहे. त्यासाठी कोड एक्सओएमएमएफएल वापरा. त्यासाठी पाठविलेली लिंक डाऊनलोड करा, असा तो संदेश आहे. हा संदेश प्राप्त झालेल्यांना आपल्या मित्राने पैसे पाठविल्याचे वाटू लागते. त्यामुळे संबंधित मोबाईलधारक त्या लिंकवर क्लिक करून लिंकमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे जातो. मात्र, ही बाब आपली फसवणूक करणारी ठरू शकते, असे सायबर एक्सपर्टचे म्हणणे आहे. अशाप्रकारचे संदेश हे फसवे असल्याची माहिती सायबर एक्सपर्ट देत आहे. अशा लिंक डाऊनलोड केल्यास तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा सायबर गुन्हेगारापर्यंत पोहोचतो. या माहितीच्या आधारे तुमच्या बँक खात्यातील पैसे काढण्यापर्यंत उपयोगी पडू शकतो. सायबर गुन्हेगार या डेटाच्या माध्यमातून आपल्या बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारू शकतात. त्यामुळे अशा संदेशांवर क्लिक न करता ते थेट डिलीट करणेच योग्य राहील.
अशी होते फसवणूक
असे संदेश कुणाला आले असतील, तर या लिंकवर क्लिक करू नये, हा फिशिंग संदेश आहे. लिंकवर क्लिक केल्यास आपल्या मोबाईलमधील संपूर्ण माहिती सायबर गुन्हेगार घेऊ शकतात. त्याचा उपयोग घेऊन ते आपली फसवणूक करू शकतात. त्यामुळे अशा संदेशापासून सावध रहा, अनोळखी क्रमांकांवरून कॉल आल्यास ओटीपी क्रमांक किंवा बँक खात्याविषयी माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे व पोलीस उपनिरीक्षक ईश्वर वर्गे यांनी केले.
या लिंकवर क्लिक केल्याचा परिणाम
या संदेशातील लिंकवर क्लिक केल्यास, अॅप्लिकेशन इन्स्टॉल सांगितले जाते. नंतर परवानगी अलाऊ करण्यास सांगितले जाते. ज्यामध्ये आपले संपर्क क्रमांक (कान्टेक्ट), लोकेशन, फोन, स्टोअरेज आणि अन्य माहिती या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून डेव्हलेपरकडे सेव्ह होते. त्या सर्व संपर्क क्रमांकावर हा संदेश जातो.