फ्री फायर गेममधून ओळख, त्याने मुंबईहून गाठली अमरावती; तरुणीचा विनयभंग, पाठलागदेखील..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 02:12 PM2022-05-18T14:12:17+5:302022-05-18T14:42:57+5:30
अभिषेकने पुन्हा मुंबईहून अमरावती गाठली व तरुणीच्या घरासमोर चकरा मारणे सुरू केले. तरुणीने आरोपी हा आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने पाठलाग करीत असताना दिसल्याची तक्रार तिने नोंदविली.
अमरावती : फ्री फायर गेममधून ओळख झालेल्या मुंबईच्या तरुणाने दोनदा अमरावती गाठून संबंधित तरुणीचा विनयभंग तथा पाठलाग केल्याची घटना येथील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ मे रोजी उघड झाली. तरुणीच्या घरासमोर घिरट्या मारतानाच त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
अभिषेक चौरसिया (२०, रा. बोरिवली, मुंबई) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तक्रारीनुसार, शहरातील एका २० वर्षीय तरुणीची सन २०२० मध्ये मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळताना अभिषेकशी ओळख झाली. यातून त्यांची बोलचाल सुरू झाली. दरम्यान, अधूनमधून मोबाईलवर संभाषण सुरू झाले. मात्र अभिषेक वेगळ्या उद्देशाने बोलत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले.
दरम्यान, यंदा एप्रिल महिन्यात अभिषेक मुंबईतून अमरावतीत आला. त्याने तरुणीच्या घरासमोर चकरा घातल्या. ही बाब तिने कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी खोलापुरी गेट पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पोलीस आले व त्याला ठाण्यातदेखील नेण्यात आले. मात्र त्यावेळी अभिषेकने पोलीस ठाण्यात तरुणीसह तिच्या कुटुंबीयांचीदेखील माफी मागितली व यापुढे असे होणार नाही, असे सांगितले. त्यामुळे शैक्षणिक भविष्याचा विचार करून कुटुंबीयांनी किंवा तरुणीने तक्रार दिली नाही. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताकीद देऊन सोडले होते.
खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार
अभिषेकने पुन्हा १६ मे रोजी मुंबईहून अमरावती गाठली व तरुणीच्या घरासमोर चकरा मारणे सुरू केले. तरुणीला तो दिसला. यावेळी मात्र तरुणीने अभिषेकविरुद्ध खोलापुरी गेट पोलिसात तक्रार दिली. आरोपी हा आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने पाठलाग करीत असताना दिसल्याची तक्रार तिने नोंदविली. १६ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास तो दिसताच तरुणीने खोलापुरी गेट पोलिसांना माहिती दिली. अटकेपासून अनभिज्ञ असलेला अभिषेक तेथेच पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याविरुद्ध कलम ३५४ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.