व्हॉट्स अॅपवरील ग्रुपमधून ‘कर्णबधिर’जपतात मैत्री
By admin | Published: January 25, 2017 12:01 AM2017-01-25T00:01:38+5:302017-01-25T00:01:38+5:30
सोशल मीडियाचा म्हणजेच व्हॉट्सअॅप, फेसबुकचा वापर जगभर सुरू आहे. मैत्री जोपासण्यासाठी तर हा मार्ग एकदम ‘स्मार्ट’ ठरतो.
सांकेतिक भाषेत संभाषण : शासकीय दुग्ध योजनेत नोकरी
संदीप मानकर अमरावती
सोशल मीडियाचा म्हणजेच व्हॉट्सअॅप, फेसबुकचा वापर जगभर सुरू आहे. मैत्री जोपासण्यासाठी तर हा मार्ग एकदम ‘स्मार्ट’ ठरतो. परंतु मूकबधिरांनी सोशल मीडिया कसा वापरायचा. वापरलाच तर मित्रांशी संवाद कसा साधायचा. ऐकण्याची आणि बोलण्याची समस्या आडवी येणारच. पण, म्हणतात ना..‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीनुसार अशाच समस्येचा सामना करणाऱ्या एका मूक-बधिराने ‘फाईन-लँग्वेज’ (सांकेतिक भाषा)चा वापर करून सोशल मीडियावर एक ग्रुप तयार केला आहे. विशेष म्हणजे या ग्रुपचे सगळेच सदस्य ‘व्हिडीओ कॉलिंग’च्या माध्यमातून एकमेकांशी वरचेवर संवादही साधतात. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण सदर मूकबधिर लिपिकाने सार्थ ठरविली आहे. गजानन गाडेकर असे या हरहुन्नरी लिपिकाचे नाव आहे.
काँग्रेसनगरातील शासकीय दूध योजना केंद्रात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत गजानन मूकबधिर आहेत. मात्र, या निसर्गदत्त उणिवेचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. त्यांचे कार्यालयीन कामकाज ते अत्यंत पारदर्शकपणे पार पाडतात. ‘हायटेक’ युगात आपण माघारू नये, याची पुरेपूर दक्षताही त्यांनी घेतली आहे. मोठ्या सफाईने ते ‘स्मार्ट फोन’चा वापर करतात. परंतु आपल्याच सारख्या आपल्या मूकबधिर मित्रांशी संवाद साधता येत नाही, त्यांचा आवाज ऐकता येत नाही. अशी खंत त्यांना बोचत होती. यासाठी त्यांनी एक शक्कल लढविली आणि त्यांच्याचसारख्या मूकबधिर मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप व्हॉट्सअॅपवर तयार केला. आता तंत्रज्ञानाच्या या युगात स्मार्ट फोनचा सकारात्मक वापर करून ते व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून सांकेतिक भाषेत मित्रांशी संवाद साधतात. प्रत्यक्ष चेहरा पाहून भावना शेअर करण्याचा आनंद वेगळाच असतो, असे ते म्हणतात.
व्हॉटस्अॅपवरील या मूकबधिरांच्या ग्रुपमध्ये ११ जणांचा समावेश आहे. याग्रुपला त्यांनी ‘शासकीय कर्मचारी संघटना’ असे नावही दिले. साईनगर परिसरातील रहिवासी गजानन गाठेकर यांचा काही वर्षांपूर्वी त्यांच्या मामाच्या मुलीशी विवाह झाला. त्यांची दोन्ही अपत्ये सुदृढ आहेत. त्यांच्या पत्नीदेखील सामान्य आहेत. त्यांनाही आता गजानन यांची सांकेतिक भाषा कळते. बारावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शासकीय नोकरी मिळविण्याची जिद्द मनाशी बाळगून या नोकरीसाठी आवश्यक टंकलेखन व संगणकाची परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण केली. यामुळेच त्यांना अपंग कोट्यातून शासकीय दूध योजना केंद्रात कनिष्ठ लिपिकाची नोकरीही मिळाली.
पत्नी आणि मुलांशी देखील गजाजन हे याच ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधतात. मितभाषी असल्याने गजानन यांचे कार्यालयातही अनेक मित्र आहेत. दूध योजना केंद्राचे दुग्धशाळा व्यवस्थापक एस.बी.जांभुळे यांचेही त्यांना सहकार्य लाभले आहे. त्यांचे मित्र बी.एस गजभिये देखील त्यांच्याशी सांकेतिक भाषेतच संवाद साधतात. अपंगत्वाचे न्यून न बाळगता ते मित्रांशी संवाद साधून आनंदाने जगत आहेत.