११०० किलोमिटरहून डीबीने आणला सराफाला लुटणारा मुख्य आरोपी
By प्रदीप भाकरे | Published: September 14, 2024 05:59 PM2024-09-14T17:59:24+5:302024-09-14T17:59:55+5:30
अटक आरोपींची संख्या सहावर : गाडगेनगर पोलिसांचे यश, पिस्टलच्या धाकावर लुटल्याचे प्रकरण
अमरावती: येथील सुवर्णकार अरविंद जावरे यांच्याकडील चांदीची १५ किलोची बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या लुटारूंच्या म्होरक्याला अटक करण्यात गाडगेनगर पोलिसांच्या डीबी पथकाला यश आले. धनंजय योगेंद्रसिंग यादव (२५, रा. बजानखाना अंतु, जि. प्रतापगड उत्तर प्रदेश) याला शुक्रवारी उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली. गाडगेनगर पोलीस त्याला घेऊन शनिवारी अमरावतीत परतले.
यापुर्वी याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. धनंजय योगेंद्रसिंग यादव हा लूट प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेखा कॉलनी येथील अरविंद उत्तमराव जावरे (५५, जवाहरनगर) हे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास वडिलांसोबत मोपेडने आपल्या ज्वेलरी शॉपकडे जात होते. दरम्यान शितला माता मंदिर जवाहरनगर येथे चार ते पाच इसमांनी त्यांना अडविले. आरोपींनी मोपेडच्या पायदानवरील चांदीचे आर्टिकल असलेली १५ किलो वजनाची बॅग जबरदस्तीने हिसकावली. जावरे यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना पिस्टल दाखविली. मारहाण देखील केली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता.
आरोपी प्रतापगढी व दर्यापूर, अमरावतीचे
याप्रकरणी, गुन्हे शाखा युनिट एकने यापुर्वी नागपुर येथून आरोपी ग्यासुद्दिन वहाजोद्दीन कुरेशी, मोहम्मद सादिक खान हारुन खान, प्रेम उर्फ प्रेमदास महादेवराव नितनवरे, विनोद शंकरराव गिरे व संजय बाबुलाल बिनकर यांना अटक केली आहे. या गुन्हयातील इतर आरोपी हे उत्तरप्रदेशात पळून गेल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रतापगढ येथे गेले होते. तेथून शुक्रवारी सायंकाळी आरोपी धनंजय यादव याला ताब्यात घेण्यात आले.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगरचे ठाणेदार प्रशांत माने यांच्या नेतृत्वात डीबी प्रमुख तथा सहायक पोलीस निरिक्षक मनोज मानकर, उपनिरिक्षक संजय डाखोरे, अंमलदार भारत वानखडे, संजय इंगळे, गुलरेज खान, नंदकिशोर करोची, महेश शर्मा, जयसेन वानखडे, नितीन कांबळी, सागर भोजने यांनी ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक