उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:50 AM2019-06-19T01:50:20+5:302019-06-19T01:51:36+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाकडे पाठविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाकडे पाठविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, विद्यापीठातील महिला, पुरुष कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून एकजुटीचे दर्शन घडविले.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्रुटीरहित सुधारित वेतन संरचना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील विद्यापीठांमधील कर्मचाºयांनी शासनाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष तसेच संत गाडगेबाबा विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात विद्यापीठ कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी लढा देत आहेत. या आंदोलनामध्ये विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघ, आॅफिसर्स फोरम, तसेच विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन सुरू केले असल्यामुळे ही लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, महासचिव विलास सातपुते, उपाध्यक्ष नीलेश वंदे, आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे, सचिव विलास नांदूरकर, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी, संतोष मालधुरे, संजय एरंडे, प्रफ्फुल ठाकरे, मंगेश वरखेडे, सुनीता मंगरूळकर, सतीश लोखंडे, संजय रामबोले, मनीष शास्त्री, दिलीप विधळे, दिलीप पाटील, नरेंद्र घाटोळ, प्रफुल्ल ठाकरे, स्मिता साठे, दिलीप काळे, पूनम जाधव, अनुपमा कळसकर, सविता खंडारे, संतोष मालधुरे, रामभाऊ भुगूल, मंजुश्री देशमुख, दादाराव चव्हाण, प्रवीण राठोड आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात पुणे येथील उच्चशिक्षण संचालनालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २९ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला जाईल. शासनाने मागण्या मंजूर न केल्यास जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.
व्हीएमव्ही ते उच्चशिक्षण कार्यालयादरम्यान मोर्चा
अमरावती विद्यापीठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थेट विद्यापीठातून मोर्चाचे आयोजन के ले होते. मात्र, विद्यापीठ ते शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेपर्यंत कर्मचारी वाहनांनी पोहोचले. त्यानंतर व्ही.एम.व्ही. ते उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयादरम्यान मोर्चा काढण्यात आला. सहसंचालक संजय जगताप यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.