काँग्रेसमध्ये ‘पदवीधर’ उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: March 26, 2016 12:09 AM2016-03-26T00:09:03+5:302016-03-26T00:09:03+5:30
विधान परिषद अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच महिन्यांनंतर होऊ घातली आहे.
चाचपणी : खोडके, चौधरी, मेटकर ही नावे आघाडीवर
अमरावती : विधान परिषद अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पाच महिन्यांनंतर होऊ घातली आहे. काँग्रेसने पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित केली नसली तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत त्याअनुषंगाने पदाधिकारी तथा इच्छूक उमेदवारांची बैठक घेतली. यात काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, भय्या मेटकर, लतिफ देशमुख आणि भाजपचे अविनाश चौधरी, बुलडाणा येथील अशोक आंबेकर, समीर नागोळे यांनी मुलाखती दिल्यात.
अमरावती पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे करीत आहेत. राज्यमंत्र्यांच्या विरोधात अमरावती पदवीधर मतदारसंघात लढाई असल्यामुळे काँग्रेसने आतापासून सावध पावले टाकायला प्रारंभ केला आहे. ना. पाटील यांचा पराभव करण्याची ताकद असलेल्या व्यक्तीला काँग्रेसची उमेदवारी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संजय खोडके हे गत सहा महिन्यांपासून पदवीधर मतदार संघ लढविण्याची तयारी करीत आहे. तसेच भाजपचे पदाधिकारी असलेले अविनाश चौधरी हेदेखील मुंबई येथील काँग्रेस कार्यालयात दाखल झाल्याने उपस्थितांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची जाणीव अविनाश चौधरी यांना झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडण्याची तयारी चालविली आहे. तर विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य भय्यासाहेब मेटकर हे देखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.
दरम्यान काँगे्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी इच्छूक उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. ना. पाटील यांचा अमरावती पदवीधर मतदारसंघात कसा पराभव करता येईल, या विषयावर काँग्रेसने मंथन केले. ना. पाटील यांना भाजपात अंतर्गत विरोध असला तरी तो कसा ‘कॅश’ करता येईल. त्याकरिता काँग्रेसची उमेदवारी कोणाला दिली पाहिजे, याअनुषंगाने चर्चा करण्यात आली.
बैठकीला खा. अशोक चव्हाण यांच्यासह माजी मंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, माजी आ.रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक गणेश पाटील, छाया दंडाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते, अक्षय भुयार, शाम गायगोले, अमोल इंगळे, ऋषी मेटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)