नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
By admin | Published: February 23, 2016 12:11 AM2016-02-23T00:11:03+5:302016-02-23T00:11:03+5:30
येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेत निवडणूक होण्याची शक्यता आहे.
नवख्यांनी बांधले बाशिंग : नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची शक्यता
अमरावती : येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेत निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणुकीत आपणच उमेदवार असल्याचे डोहाळे नव्या चेहऱ्यांना लागले असून त्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी करून गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र नगरपालिका क्षेत्रात पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ जानेवारी २०१७ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यासाठीे काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने येथे राजकीय घडामोडीत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. या तयारीला राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नगरपरिषदांची निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. त्यामुळे नवख्या उमेदवारांनी आपल्या सोयीचा वॉर्ड पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. सामान्य नागरिकांना विकासाचे गाजर दाखवून आपण अमूक पक्षाचे उमेदवार असल्याचे भासवून देत आहे. सामान्यांच्या अडीअडचणी सोडविणे कुणास दत करणे, लग्न समारंभ वाढदिवसात हजेरी लावणे आदींच्या माध्यमातून गल्लीबोळात फिरताना हे इच्छुक उमेदवार सामान्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची करण्याकरिता विविध पक्षाचे नेते अशा मालदार उमेदवारांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे वेळेवर कोणाला तिकीट मिळाले नाही तर वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची तयारीसुद्धा असल्याचे इच्छुकांमध्ये बोलले जात आहे. परिसरात विविध समस्या असल्याने त्या कशा सोडवाव्यात याचा अभ्यास करुन नगरवासीयांना पाणी, रस्ते, पथदिवे यासह विकास करण्याचे दिव्य स्वप्न दाखवून आतापासूनच काहींनी प्रचारात सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे. (प्रतिनिधी)