स्थायीसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 12:52 AM2016-02-22T00:52:16+5:302016-02-22T00:52:16+5:30

महापालिकेत वजनदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य हे मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ...

Frontline for Standing | स्थायीसाठी मोर्चेबांधणी

स्थायीसाठी मोर्चेबांधणी

Next

काँग्रेसमध्ये जंबो यादी : राकाँ, भाजप-सेना, बसपा, जनविकासमध्ये स्पर्धा
अमरावती : महापालिकेत वजनदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य हे मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आमसभेत नियुक्त केले जाणार आहे. स्थायी समितीत सदस्य म्हणून निवड व्हावी, यासाठी नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा असून नेत्यांची मनधरणी केली जात आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीत होऊ घातलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जून २०१६ पासून वॉर्ड रचनेला प्रारंभ होणार आहे. हे वर्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंट, भाजप, सेना, बसपा, रिपाइं व जनविकास काँग्रेसमध्ये स्थायी समितीत प्रवेशासाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकदा स्थायी समितीत प्रवेश मिळाला की सभापती पदासाठी ‘फिल्डींग’ लावणे सोपे जाते, हे अपेक्षित ठेवून अनेकांनी नेत्यांची मनधरणी चालविली आहे. स्थायी समितीत नगरसेवकांचे सदस्य म्हणून नावांची नियुक्ती करण्यासाठी गटनेत्यांचे पत्र आवश्यक आहे. गटनेत्यांने दिलेल्या पत्रानुसार सर्वसाधारण सभेत महापौर सदर नावांची घोषणा करून स्थायी समितीत सदस्य म्हणून निवड करतात. स्थायी समिती ही मलईदार असल्यामुळे बहुतांश नगरसेवक हे या समितीत प्रवेशासाठी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र काही दिवसांपासून महापालिकेत दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये स्थायी समितीत सदस्य म्हणून प्रवेशासाठी नगरसेवकांची जंबो यादी आहे. पक्षनेता बबलू शेखावत यांच्या दालनात स्थायी समितीत प्रवेशासाठी दरदिवसाला नगरसेवकांचा ठिय्या ही नित्याचीच बाब होती. काँग्रेसमधून स्थायी समितीत सदस्य म्हणून माजी आ. रावसाहेब शेखावत यांचा निर्णय अंतिम राहील, अशी माहिती आहे. मात्र गत आठवड्यात काँग्रेसचे निरीक्षक गणेश पाटील, रामकृष्ण ओझा यांनी स्थायी समितीत सदस्य निवडीच्या अनुषंगाने काँग्रेस नगरसेवकांची मते जाणून घेतली आहेत. हल्ली काँग्रेसमधून नियमानुसार सभापती विलास इंगोले व योजना रेवस्कर हे दोन सदस्य बाहेर पडतील. मात्र काँग्रेसमध्ये स्थायी समितीत सदस्य नियुक्तीसाठी ८ ते १० जण इच्छुक आहेत. हीच परिस्थिती राष्ट्रवादी फ्रंटमध्ये असून वंदना हरणे, सारिका महल्ले हे दोन सदस्य बाहेर पडणार आहेत. परंतु राष्ट्रवादी फ्रंटमधून नव्याने पाच ते सहा नगरसेवक स्थायी समितीत नियुक्तीसाठी संजय खोडके यांच्याकडे लॉबींग करीत आहेत. भाजप, सेना, रिपाइं, बसपा, जनविकास काँग्रेसमध्ये देखील स्थायी समितीत सदस्य नियुक्तीसाठी स्पर्धा आहे. नेमके कोणाची वर्णी लागते, हे २३ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल. ु काँग्रेसमध्ये स्थायी समितीत निवड करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे माजी आ. रावसाहेब शेखावत यांना जे नाव सांगतील तेच नावे पाठविली जातील अशी माहिती आहे.

Web Title: Frontline for Standing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.