‘आंबिया’ला गळती, स्वप्न भंगले; पंचनाम्यानंतर भरपाई मिळेल का?
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 1, 2023 05:04 PM2023-09-01T17:04:48+5:302023-09-01T17:07:25+5:30
जिल्हाधिकाऱ्यांद्वारा पंचनाम्याचे आदेश; ४९ हजार हेक्टरमधील संत्राचे करोडोंचेे नुकसान
अमरावती : शेतकऱ्यांमागे संकटाचे सत्र सारखे मागे लागले आहे. महिनाभरापासून संत्राच्या आंबिया बहराची फळगळ सुरु असल्याने झाडांखाली खच पडला आहे. यामध्ये ४८५६५ हेक्टरमध्ये ७४ टक्के फळगळ झाल्याचा कृषी विभागाचा नजरअंदाज अहवाल आहे. या फळगळीचे पंचनामे करुन संयुक्त स्वाक्षरी अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी २९ ऑगस्टला दिले आहे.
जिल्ह्यात संत्रा बागांचे ८२४४६ हेक्टर क्षेत्र आहे. संत्राला मृग व आंबिया असे दोन बहर येतात. जिल्ह्यात सर्वाधिक ६५२०५ हेक्टरमध्ये आंबिया बहराचे उत्पादन घेतल्या जाते. त्यातुलनेत मृग बहर ८८३२ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा आंबिया बहराची फळे पक्व होण्याच्या अवस्थेत असताना अचानक फळगळ सुरु झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात अचानक सुरु झालेल्या फळगळीने संत्रा उत्पादकांवर संकट ओढावले आहे.