केंद्र शासनाच्या एफएसएसएआयचं पथक दूध तपासणीसाठी विदर्भात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 04:38 PM2018-09-29T16:38:15+5:302018-09-29T16:39:23+5:30

केंद्र शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचं (एफएसएसएआय) पथक दूध तपासणीसाठी विदर्भात दाखल झालं आहे.

FSSAI squad for Vidharbha to check milk | केंद्र शासनाच्या एफएसएसएआयचं पथक दूध तपासणीसाठी विदर्भात

केंद्र शासनाच्या एफएसएसएआयचं पथक दूध तपासणीसाठी विदर्भात

googlenewsNext

वैभव बाबरेकर

अमरावती - केंद्र शासनाच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचं (एफएसएसएआय) पथक दूध तपासणीसाठी विदर्भात दाखल झालं आहे. देशभरातील दुधांचे नमुने गोळा करून गुणवत्तेचा आढावा घेत दुधात काही बदल किंवा भेसळ होत आहे का, याचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती एफडीए सूत्रांनी दिली. दूध नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर कारवाईबाबत केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट होईल. 

देशपातळीवर अन्नपदार्थांचा दर्जा व त्याद्वारे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानव प्राधिकरणाच्या चमूने सद्यस्थितीत दुधाच्या तपासणीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अन्न व औषधी प्रशासनाच्या हैद्राबाद येथील विमटा लॅबचं पथकसुद्धा आहे. देशातील विविध राज्यांमध्ये एफएसएसएआय व प्रयोगशाळेतील अधिकारी दुधाचे नमुने गोळा करण्याच्या कामी लागले आहेत. बदलत्या काळानुसार दुधाच्या गुणवत्तेत किंवा गुणधर्मात काही बदल झाला आहे का, पूर्वीप्रमाणे मिळणाऱ्या नैसर्गिक दुधातील घटकांमध्ये काही बदले झालेत का, गाय, म्हैस यांच्या दुधाच्या गुणवत्तेत काही बदल झालेत का, भेसळयुक्त दुधाची विक्री होत आहे का, आदी बाबी लक्षात घेता, दूध नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.

देशभरातील विविध राज्यांमध्ये दुधाची गुणवत्ता कशी आहे,  परिसर बदलला की दुधात काय बदल घडला आहे, पूर्वीच्या दुधात व आताच्या दुधात काही बदल झालेत का, या सर्व बाबी तपासून पाहण्यासाठी दूध नमुने गोळा केले जात आहे. एफएसएसएआयचे अधिकारी नुकतेच विदर्भ दौऱ्यावर आले असून, त्यांनी नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम व अमरावतीमधील दुधाचे नमुने गोळा केले आहे. एफएसएसएआयचे सर्वेक्षण अद्याप सुरू असून, दूध तपासणीच्या अहवालानंतर देशभरातील दुधाचे चित्र स्पष्ट होणार आहे. अहवालाच्या अनुषंगाने केंद्र शासन पुढील कारवाईची दिशा ठरविणार आहे. 

अमरावतीत सहापैकी दोन नमुने अप्रमाणित

अमरावतीच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी दुधाचे सहा नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले होते. त्यापैकी दुधाचे दोन नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. यावरून अमरावती शहरातही अप्रमाणित दुधांची विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या अनुषंगाने राज्य किंवा देशभरातही अशाच प्रकारची स्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे अधिकारी विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते.  दुधाचे नमुने गोळा करून, त्याची तपासणी केली जाणार आहे. देशभरातील विविध राज्यांतून दूध नमुने गोळा केले जात असून, दूध नमुन्यांच्या तपासणीनंतर शासनाची काय भूमिका राहील, हे कळेलच.
- सचिन केदारे, सहायक आयुक्त (अन्न) अमरावती.

Web Title: FSSAI squad for Vidharbha to check milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.