अतिक्रमण निर्मूलन विभागात ‘इंधन’ घोटाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:57 PM2017-12-23T23:57:29+5:302017-12-23T23:57:41+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागात इंधनाच्या नोंदी न घेता कागदोपत्रीच लाखो रुपयांची उचल केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रदीप भाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागात इंधनाच्या नोंदी न घेता कागदोपत्रीच लाखो रुपयांची उचल केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रथमदर्शनी हा घोटाळा २० लाखांच्या घरात असला तरी सखोल चौकशीनंतर अनियमितता वाढण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. मागील पाच महिन्यांपासून वाहनांच्या लॉगबुकमध्ये इंधन व प्रवासाच्या नोंदीच घेण्यात आल्या नाहीत, त्यामुळे इंधनावर झालेला खर्च कुठल्या नोंदीच्या आधारे अदा करण्यात आला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अतिक्रमण विभागात कार्यरत वाहनांचे लॉगबुक व पेट्रोल लेखा बुकमधील नोंदी अपूर्ण असल्याबाबत आयुक्त हेमंत पवार यांनी कुत्तरमारे यांना २२ डिसेंबर रोजी उशिरा कारणे दाखवा नोटीस बजावली. ही गंभीर अनियमितता कुत्तरमारे यांचे विभागावर नियंत्रण नसल्याने घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. लक्षावधी रुपयांच्या या अनियमितेबाबत तीन दिवसांमध्ये खुलासा करावा, खुलासा प्राप्त न झाल्यास आपणाविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी तंबी कुत्तरमारे यांना देण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागात काही दिवसांपासून वाहनातील इंधनाच्या नोंदी घेण्यात येत नसल्याची तक्रार उपायुक्त महेश देशमुख यांना प्राप्त झाली होती. त्या तक्रारीची खातरजमा केली असता मोठे घबाड हाती लागले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागात कुणाचाही पायपोस कुणाच्याही पायात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यात हा लॉगबुक व इंधन घोटाळा उघड झाल्याने कुत्तरमारे यांचे विभागावरील अक्षम्य दुर्लक्ष अधोरेखित झाले आहे.
इंधनावर वारेमाप खर्च
अमरावती : अतिक्रमण निर्मूलन विभागात दोन पोकलॅण्ड, तीन जेसीबी, दोन टिप्पर व प्रत्येकी एक जीप व सुमो वाहन आहे. अतिक्रमण निर्मूलन कारवाईवेळी ही वाहने वापरली जातात.त्या वाहनात कार्यशाळा विभागाकडून इंधन भरले जाते. या आघ वाहनांसाठी माहिन्याकाठी इंधनाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाने देयके सादर केल्यानंतर संबंधितांना इंधनाचे देयके दिली जातात. मात्र, यात काही दिवसांपासून काही कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांना हाताशी धरून भ्रष्टाचार चालविला आहे. त्या तक्रारीच्या आधारे उपायुक्त महेश देशमुख यांनी शुक्रवारी दुपार दरम्यान अतिक्रमण निर्मूलन विभागाला आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांचेसमवेत प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, मुख्यलेखाधिकारी प्रेमदास राठोड आणि कार्यशाळेचे उपअभियंता स्वप्निल जसवंते उपस्थित होते.या पथकाने एकलण नऊ वाहनांचे लॉगबुक तपासले असता दररोज प्रत्येक वाहन ६ ते ७ तास चालल्याचे दिसून आले. मात्र त्याचवेळी नऊही वाहनांच्यावापराच्या नोंदी व त्याकरिता लागणाºया इंधनाच्या नोंदी एकसारख्या दिसून आल्या.सर्व नऊही वाहने दररोज सारखेच वापरात असल्याची नोंद शंका उत्पन्न करणारी ठरली.सर्व वाहनांना ठरवून देण्यात आलेला इंधन कोटा पुर्णपणे वापरल्याचे दिसून आले. संपुर्ण महिन्यभारात बोटावर मोजण्याइतपत अतिक्रमण निर्मुलानाच्या कारवाी होत असताना साºयाच वाहनांचा वापर एकसारखाच कसा झाला, त्यांना नेमून दिलेला इंधन कोटा पूर्ण खर्च होणे शक्य आहे का? या दृष्टीनेही चौकशी करण्यात येणार आहे. वाहनांच्या लॉगबुकमध्ये दररोज नोंद करणे अनिवार्य असताना महिन्याच्या शेवटी त्या नोंदी घेतल्या जात असल्याचे गंभीर निरीक्षण या पथकाने नोंदविले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी महेश देशमुख यांनी लॉगबुकमधील अनियमिततेबाबतचा प्रथमदर्शनी अहवाल आयुक्त हेमंत पवार यांच्याकडे दिला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयुक्तांनी सायंकाळी कुत्तरमारे यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
पाच महिन्यांपासून नोंदीला फाटा
प्रत्येकी दोन टिप्पर व जेसीबी या वाहनांच्या लॉगबुकमध्ये मागील पाच महिन्यांपासून नोंदी घेण्यात आल्या नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या वाहनांचे लॉगबुकच अतिक्रमण विभागाच्या संबंधित कर्मचाºयांकडे उपलब्ध नव्हते. ती लॉगबुक कुठे आहेत, याचे उत्तरही मिळाले नाहीत.ती बुक कामावरुन कमीकेलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी असल्याची माहिती पथकाच्या हाती आली. कुत्तरमारे यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर या अनियमिततेच्या चौकशीला वेग येणार आहे. वाहनांच्या वापराबाबत लॉगबुकमध्ये कित्येक महिन्यांपासून नोंदी नसताना देयके देण्यात आली. ती कशाच्या आधारावर देण्यात आली, हे चौकशीच्या पुढील टप्प्यात दृष्टीपथास येईल.
उपायुक्त व अन्य अधिकाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागास शक्रवारी भेट दिली असता तेथील वाहनांच्या लॉगबुक व पेट्रोल लेखा बुकमध्ये अनियमितता आढळून आली. त्याबाबतचा प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर गणेश कुत्तरमारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
- हेमंतकुमार पवार,
आयुक्त, महापालिका