दलितवस्ती पाणी पुरवठ्यासाठी निधी, अमरावती महापालिकेला ३२ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 07:22 PM2017-09-29T19:22:07+5:302017-09-29T19:22:28+5:30
नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील चार नागरी स्थानिक संस्थांना ६१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात अमरावती महापालिकेसह वरूड, चिखलदरा व चांदूरबाजार नगरपरिषदेचा समावेश आहे.
अमरावती - नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील चार नागरी स्थानिक संस्थांना ६१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात अमरावती महापालिकेसह वरूड, चिखलदरा व चांदूरबाजार नगरपरिषदेचा समावेश आहे.
२५ आॅगस्ट २००६ च्या शासन निर्णयान्वये नागरी भागातील दलित वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत महापालिकांना ३२ लाख, ‘अ’ वर्ग नगरपरिषदांना १५, ‘ब’ वर्ग न.प. ला १२ लाख तर ‘क’ वर्ग नगरपरिषदेला १० लाख रूपये अनुदान मंजूर केले जाते. या योजनेंतर्गत हा निधी अमरावती महापालिकेसह तीन नगरपरिषदांना मिळावा, यासाठी जिल्हाधिकाºयांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अमरावती महापालिकेला ३२ लाख, वरूड नगरपरिषदेस १२ लाख, चिखलदरा नगरपरिषदेस १० लाख व चांदूरबाजार नगरपरिषदेस ६.९८ लाख रूपये अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
नागरी पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर आहे. ते या योजनेचे जिल्हास्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी असतील.
असे होईल काम
अमरावती महापालिकेला मंजूर झालेल्या ३२ लाखांमध्ये जुन्या ३२ प्रभागातील बोअरवेल आणि हँडपंपची उभारणी होईल, तर वरुड न.प.च्या प्रभाग क्र. १ मध्ये १५० एमएमसीआय पाईप पाणीवितरण नलिका टाकण्यात येईल. चिखलदरा पालिकेला मिळालेल्या १० लाखांतून चिखलदरा येथील लोअर प्लॉटोवरील जुनी टाकी पाडून तेथे ८० हजार लीटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधण्यात येईल. तर चांदूरबजार नगरपरिषदेतील दलित वस्तीच्या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.