निधीची वानवा, योजनेचा कांगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:34 PM2018-01-16T22:34:15+5:302018-01-16T22:34:56+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्य विधिमंडळाची विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण समिती मंगळवारपासून दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आहे. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात विमुक्त जाती, जमातीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भरती, बढती, आरक्षण अनुशेष व त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.
समितीच्या पदाधिकाऱ्यांना शासनाच्यामार्फत वरील घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ गरजूंना मिळत नसल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे निधीची वानवा अन् योजनांचा कांगोवाच असल्याचे चित्र स्पष्ट झाले.परिणामी या परिस्थिती मुळे वरील घटकांतील नागरीकांना कल्याणकारी योजनेचा लाभ देतांना प्रशासकीय यंत्रणेसमोर पेचप्रसंग निर्माण झाले आहे. यामुळे विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील लोकांना न्याय देण्यासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी समितीमार्फत शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार असल्याचे या समितीचे प्रमुख आ. गोवर्धन शर्मा यांनी सांगितले. झेडपीत विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या भरती, बढतीचा आढावा, आरक्षण अनुशेषाचा विभागनिहाय आढावा घेतला आ.गोवर्धन शर्मा, सदस्य आ. हरीसिंग राठोड,काशिराम पावरा यांनी त्यात सुधारणेसाठी टिप्स अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. योजना राबविताना अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी समितीचे निदर्शनास आणून दिले. शिष्यवृत्ती, महामंडळांना निधी नसल्याचे दिसून आले. मेळघाटातील कुपोषण, दुधव्यवसाय, रोजगार, पर्यटन, या समस्या व लाभार्थ्याना न्याय देण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्यासोबतच काही सुधारणा करण्याचे दृष्टीने समिती पाठपुरावा करणार असल्याचे गोवर्धन शर्मा यांनी स्पष्ट केले. बैठकीला मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, संजय इंगळे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
समितीमधील अनेक आमदारांनी फिरविली पाठ
विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण समितीत एकूण १५ आमदारांचा समावेश आहे. यापैकी समितीचे प्रमुख आ.गोवर्धन शर्मा, आ. काशिराम पावरा व आ.हरिसिंग राठोड आदी तीनच आमदार उपस्थित होते. आमदार महेश चौघुले, जीवा पांडू गावीत, प्रभुदास भिलावेकर, नरेंद्र पवार, चंद्रकांत सोनवणे, प्रताप सरनाईक, नारायण पाटील, नरहरी झिरवाळ, वर्षा गायकवाड, प्रवीण दरेकर, अब्दुला खान दुर्राणी, बाळाराम पाटील आदी गैरहजर होते.