संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, विधवा निवृत्ती योजनेसाठी मिळाला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:11 AM2021-04-26T04:11:13+5:302021-04-26T04:11:13+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू कडक निर्बंधांच्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा, या हेतूने राज्य ...
अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू कडक निर्बंधांच्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा, या हेतूने राज्य सरकारने घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील ३५ लाख लाभार्थींना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे दरमहा एक हजार याप्रमाणे दोन महिन्यांचे अर्थसाहाय्य देण्यासाठी १४२८ कोटी ५० लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हास्तरावर योजनेच्या लाभार्थीच्या बँक खात्यात ही रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पाच योजनांसाठी निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला. याबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
----------------
असा मिळाला योजनांना निधी
संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण)- ३३० कोटी
संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) ६० कोटी
संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जमाती) ४५ कोटी,
श्रावणबाळ योजना (सर्वसाधारण) - ६६० कोटी,
श्रावणबाळ योजना (अनुसूचित जाती) १२० कोटी,
श्रावणबाळ योजना (अनुसूचित जमाती) - ९० कोटी
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना -११० कोटी
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना - १२ कोटी
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना - १.५० कोटी