मेळघाट विकासावर निधी कमी पडणार नाही; सिडकोच्या कामाला गती देणार - सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 07:48 PM2018-10-03T19:48:49+5:302018-10-03T19:49:05+5:30
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर वन प्रशिक्षण केंद्र येथे व्याघ्र प्रकल्पातर्फे आयोजित जागतिक वन्यजीव सप्ताहांतर्गत येथील आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे वने तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
चिखलदरा (अमरावती) : मेळघाटातील चार कामांना आपण प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामध्ये १० वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या येथील सिडको प्रकल्प १९७२ सालापासून सुरू असलेले वन प्रशिक्षण केंद्र धारणी चिखलदरा येथील तहसील व पंचायत समिती इमारती आणि चिखलद-यातील रस्ता विकास कामासोबतच पुनर्वसन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेंतर्गत आदिवासींचा विकास आदी सर्व कामे तत्काळ प्राधान्यक्रमाने मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे वने तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर वन प्रशिक्षण केंद्र येथे व्याघ्र प्रकल्पातर्फे आयोजित जागतिक वन्यजीव सप्ताहांतर्गत येथील आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर खासदार आनंदराव अडसूळ, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, चंद्रपूर जि.प. अध्यक्ष देवराव घोंगडे, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी, नगराध्यक्ष विजया सोमवंशी, उपवनसंरक्षक विशाल माळी, अविनाश कुमार, गुरुप्रसाद प्राचार्य यशवंत बहाळे, विनोद शिवकुमार, मनोज खैरनार, पं.स.सदस्य सुनंदा काकड, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, सुनील भालेराव, वनमंत्र्यांचे स्वीय सहायक सुधीर राठोड, वनक्षेत्राधिकारी मुनेश्वर, आवारे आदी वनाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. चिखलदरा पर्यटन स्थळ वरील रस्त्याच्या बाबत तत्काळ निर्देश दिले असून उपरोक्त सर्व कामांचा आढावा दोन महिन्यात सतत घेण्याचे आदेश दिले आहे येत्या १५ दिवसांत सिडको अंतर्गत बैठक बोलवण्यात आली आहे. वन प्रशिक्षण केंद्राच्या या भव्य परिसरात सूक्ष्म निरीक्षण आवश्यक गरजा आधी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तत्काळ कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले
वनकर्मचाऱ्यांचे प्रात्यक्षिक पाहून भारावले
१ मे, २६ जानेवारी, १५ आॅगस्ट रोजी पोलीस मानवंदना देताच वनकर्मचाºयांच्या प्लाटूनने त्यांना मानवंदना दिली. जंगलात आग, जंगली प्राण्यांनी हमला केल्यास त्यांच्यापासून बचावासाठी विविध प्रकारचे प्रात्यक्षिक वनकर्मचाºयांनी यावेळी केले. हे पाहून वनमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.
पुनर्वसन, अतिक्रमण, चराईचा प्रश्न मार्गी
मेळघाटातील वनविभागाच्या जागांवर मोठ्या प्रमाणात आदिवासींनी अतिक्रमण करून शेती केली आहे. दुसरीकडे गवळी समाजाच्या गुरांच्या चाºयाचा प्रश्न, त्यातून वनविभाग व्याघ्र प्रकल्प व स्थानिक रहिवासी यांच्यात संघर्ष उडतो. या प्रश्नावर समोपचाराने मार्ग काढण्याचे आदेश त्यांनी वनाधिकाºयांना दिले. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी हा प्रश्न लावून धरला होता.
आमदार, खासदारांच्या सर्व मागण्या मान्य
मेळघाट विकासासाठी आमदार प्रभुदास भिलावेकर व जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढे रोजगार निर्माण परतवाडा- चिखलदरा रस्ता, स्थलांतर, पुनर्वसन, धारणी - चिखलदरा येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत आदी विविध मुद्दे मांडले. वन तथा वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व मागण्या मंजूर करीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प वनविभाग आणि चिखलदरा पर्यटनासाठी कधीच निधीची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शहापूर येथे श्यामाप्रसाद जन्वर योजनेअंतर्गत शिलाई मशीन प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. चिखलदारा नगरपालिका व वन विभागांतर्गत वाचनालय तसेच सिडको कार्यालय येथे प्रदर्शनीचे पाहणी त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक विशाल माळी यांनी केले.