पालिकेला उशिरा माहिती दिल्याने पाच तासानंतर अंत्यसंस्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:59+5:302021-05-14T04:13:59+5:30
वरूड : तालुक्यातील राजुराबाजार येथील ६० वर्षीय कोविड पॉझिटिव्ह महिलेचा वरुडच्या खासगी कोविड रुग्णालयात बुधवारी दुपारी ...
वरूड : तालुक्यातील राजुराबाजार येथील ६० वर्षीय कोविड पॉझिटिव्ह महिलेचा वरुडच्या खासगी कोविड रुग्णालयात बुधवारी दुपारी २ वाजतादरम्यान मृत्यू झाला. याबाबत त्या खासगी रुग्णालयाने नगरपरिषद प्रशासनाला सायंकाळी ५.३० च्या सुमारास कळविले. त्यामुळे तब्बल पाच तासानंतर नगर परिषदेने त्या महिलेच्या पाथिर्वावर अंत्यसंस्कार केले.
खासगी कोविड रुग्णालयाच्या चुकीमुळे मृतकांच्या नातेवाईकांना पाच तास ताटकळत बसावे लागले . यामुळे नातेवाईकांत रोष व्यक्त केल्या गेला. अखेर रात्री ७.४५ च्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले. महिलेच्या मृत्यूची माहिती रूग्णालयाकडून नातेवाईकांना देण्यात आली. मात्र नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आली नाही. नातेवाईकांनी उपमुख्याधिकारी गाडगे यांना माहिती दिली. परंतु रुग्णालयातून माहिती मिळत नाही तो पर्यंत आम्ही येऊ शकत नाही. यामुळे रुग्णालय प्रशासनाला माहिती देण्यास सांगा, असे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी मुख्याधिकार्याना माहिती दिल्यानंतर नगर परिषदेचे कर्मचाऱी मृतदेह घेण्यास कोविड रुग्णालयात पोहचले. मृतदेह नेण्याकरिता रुग्णवाहिका नव्हती तर रुग्णालयात जबाबदार प्रशासकीय अधिकारी हजर नव्हते. तर ट्रॅक्टरमध्ये मृतदेह न्या, असे सांगण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करून तहसीलदार किशोर गावंडे यांना माहिती दिल्यानंतर प्रभारी तहसीलदार देवानंद धबाले यांनी रुग्णालय गाठून चौकशी केली आणि तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह अंत्यसंसंकाराला नेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, गटविकास अधिकरी वासुदेव कणाटे यांनासुद्धा भ्रमणध्वनी वरून संपर्क करून घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.
कोट
कोरोनाबाधिताच्या मृत्यूची माहिती स्थानिक प्रशासन, तालुका आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षकांना तातडीने देणे गरजेचे आहे. तातडीने अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी स्थानिक नगर परिषद किंवा ग्राम पंचायतीला विनाविलंब माहिती देणे आवश्यक आहे. झालेला प्रकार गंभीर आहे. चौकशी करू.
- शामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक
कोट २
नगर परिषदेला सायंकाळी ५.३० च्या सुमारास कोरोनाबाधिताच्या मृत्यूची माहिती मिळाली. यानुसार आम्ही पीपीई किट देऊन कर्मचारी आणि लाकडे पाठविली.
रवींद्र पाटील, मुख्याधिकारी