सासरी मोरगावात दीपालीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:16+5:302021-03-27T04:14:16+5:30
बडनेरा : महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृतदेहावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात ...
बडनेरा : महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृतदेहावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या कर्तबगार महिला अधिकाऱ्याचा हृदयद्रावक शेवटाबाबत सर्व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून एकाही घरात चूल पेटली नाही.
मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव हे सासर आहे. त्यांच्याप्रती गावकऱ्यांमध्ये कौतुकाने बोलले जात होते. अत्यंत मनमिळावू, सर्वांना आपलेसे करणाऱ्या दीपालीचा मृत्यू गावाला चटका लावून गेला. प्रत्येक कार्याप्रसंगी त्या मोरगावात अनेकदा येत होत्या. गावाशी त्यांचे कौटुंबिक नाते जुळले होते. अत्यंत हुशार कर्तबगार म्हणून त्यांचे गावात नावलौकिक आहे. त्यांच्या समाजात एकमेव अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याची बाब चर्चेत आल्याने मोरगावात ‘त्या’ वनाधिकाऱ्यांच्या प्रति तीव्र संताप व्यक्त होत आहे. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास शवविच्छेदनानंतर दीपाली यांचा मृतदेह गावात आणण्यात आला. त्यावेळी गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूला जो कुणी कारणीभूत असेल त्यांना कठोर शिक्षा लवकरात लवकर मिळालीच पाहिजे, असा जनआक्रोश या गावात आहे. अंत्यसंस्काराला खासदार नवनीत राणा, चीफ वाइल्ड लाइफ वॉर्डन महाराष्ट्र स्टेट नितीन काकोडकर, वनबलप्रमुख साई प्रकाश, बेलदार समाजाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू साळुंखे, उपवनसंरक्षक पीयूष जगताप, लोणी पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक अहेरकर यांच्यासह पंचक्रोशीतील गावकरी व नातेवाईक हजर होते.
बॉक्स
खासदारांनी दिले आश्वासन
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांसह नातेवाईकांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली. आपण स्वत: केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलून रेड्डी यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन खासदार नवनीत राणा यांनी गावकऱ्यांना दिले.
बॉक्स
नातेवाईकांचा आक्रोश
रुपाली चव्हाण यांचा मृतदेह मोरगावात शुक्रवारी सायंकाळी आणण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते. मृतदेह येताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या आईला अश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांनीदेखील संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खसदारांकडे केली.