गारपिटीनंतर संत्र्यावर बुरशी रोगाचा अटॅक; उत्पादकांसमोर संकट
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 2, 2023 06:21 PM2023-05-02T18:21:44+5:302023-05-02T18:22:07+5:30
Amravati News दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.
गजानन मोहोड
अमरावती: दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
गारपिटीने झाडाच्या सालीवर जखमा होतात. यामधून वेगवेगळ्या बुरशींचे संक्रमन होत आहे.
यामध्ये फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डीफ्लोडीया, ऑलटरनारीया यासारख्या बुरशी जखमांमधून शिरकाव करीत असल्याने रोगाचा प्रसार होत आहे. यासोबतच झाडांच्या पानालादेखील मार लागल्याने पाने फाटून गळ होत आहे. त्यामुळे झाडाची सुर्यप्रकाशापासून अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावत आहे. यामध्ये संत्र्याच्या आंबिया व लिंबूच्या हस्त बहराची फळगळ होत आहे.
जखमा भरुन निघाव्या व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी मोडलेल्या फांद्या आरीच्या सहाय्याने कापून घ्याव्या व कापलेल्या भागावर व बुंध्यावर जमिनीपासून एक मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. झाडाची साल फाटल्यास १ टक्के पोटॅशियम परमॅगनेट द्रावणाने स्वच्छ पुसून घ्यावे व जखमांवर बोर्डो पेस्ट लावावी. झाडे उन्मळून पडली असल्यास व मुळे उघडी पडली असल्यास बांबूच्या साहाय्याने उभी करण्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे अ. भा. समन्वयीत संशोधन प्रकल्पाने दिली.