‘मनभरी’च्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी
By Admin | Published: April 19, 2017 12:02 AM2017-04-19T00:02:12+5:302017-04-19T00:02:12+5:30
‘मनभरी’च्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी आढळल्याची तक्रार सोमवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाली.
अमरावती : ‘मनभरी’च्या ‘सँडविच ब्रेड’मध्ये बुरशी आढळल्याची तक्रार सोमवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाली. त्याअनुषंगाने शहरात कालबाह्य खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
दस्तुरनगर मार्गावरील पूजा कॉलनीतील रहिवासी अमित विकासपंत सहारकर (३३) हे सोमवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कंवरनगरातील मनभरी प्रतिष्ठानात गेले होते.
कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी
अमरावती : त्यांनी मनभरीच्या ‘सुपर व्हाईट सँडविच ब्रेड’चे एक पाकिट खरेदी केले. ते त्यांनी घरी नेऊन उघडले असता आतील ब्रेड बुरशीने बरबटलेली आढळून आली. त्यांनी ब्रेडच्या पाकिटाचे निरीक्षण केले असता ‘ब्रेड’ कालबाह्य झाल्याचे दिसून आले. ‘मनभरी’च्या उत्पादकांनी कालबाह्य ब्रेडची विक्री करून फसवणूक केल्याचे सहारकरांच्या लक्षात येताच याबाबत तक्रार करण्याकरिता त्यांनी थेट अन्न व औषधी प्रशासन कार्यालय गाठले. मनभरी उत्पादकांनी कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सहारकर यांनी तक्रारीतून केली आहे.
मनभरी चिवड्यात आढळली होती तळलेली पाल
काही महिन्यांपूर्वी चक्रधर नगरातील एका महिलेने ‘मनभरी’चे चिवडा पाकीट खरेदी केले होते. या पाकिटात चक्क तळलेली पाल आढळली होती. त्यामुळे महिलेला उलट्यांचा त्राससुद्धा झाला होता. तक्रारीनंतर एफडीएमार्फत चौकशी करण्यात आली. त्यावेळी ‘मनभरी’ च्या कारख्यान्यात काही त्रुटीसुद्धा आढळून आल्या होत्या. मनभरीच्या चिवड्याचे प्रकरण अद्यापही एफडीएच्या कोर्टात सुरु आहे. असे असताना पुन्हा एकदा ‘मनभरी’ उत्पादनांबद्दलचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.