दाट धुक्यांचा प्रकोप, हजारो हेक्टरवरील सोयाबीन मलूल

By admin | Published: September 7, 2015 12:23 AM2015-09-07T00:23:31+5:302015-09-07T00:23:31+5:30

जिल्ह्यातील बहुतेक भागात शनिवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे हजारो हेक्टरमधील शेंगा भरण्याच्या स्थितीतील सोयाबीन मलूल पडले आहे.

The fury of dense fog, soyabean malleon on thousands of hectares | दाट धुक्यांचा प्रकोप, हजारो हेक्टरवरील सोयाबीन मलूल

दाट धुक्यांचा प्रकोप, हजारो हेक्टरवरील सोयाबीन मलूल

Next

निसर्गापुढे शेतकरी हतबल : खोडअळी, चक्रभुंगा, मोझॅकपाठोपाठ नवे संकट
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यातील बहुतेक भागात शनिवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे हजारो हेक्टरमधील शेंगा भरण्याच्या स्थितीतील सोयाबीन मलूल पडले आहे. यापूर्वी खोडअळी, चक्रभुंगा व पिवळा मोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे पीक धोक्यात आले असतानाच आलेल्या या आकस्मिक संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यामध्ये सरासरी उत्पन्नात ५० टक्क्याने घट येण्याची शक्यता आहे.
शनिवारी पहाटे जिल्ह्यात बहुतेक भागात दाट धुके पडले. सकाळी आठ वाजेपर्यंत हे धुके कायम होते. यानंतर दुपारपासून सोयाबीनच्या पिकाने माना टाकण्यास सुरूवात केली. धुक्याचा सर्वाधिक प्रकोप तिवसा तालुक्यात झाला. आसेगाव, अंजनगाव बारी येथील शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. संरक्षित सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतामधील सोयाबीनदेखील धुक्याचे बळी पडले आहेत.

वातावरणाचा बदल कारणीभूत
अमरावती : आधीच धोक्यात आलेल्या सोयाबीन पिकावर या धुक्याच्या संकटामुळे शेतकरी मात्र कमालीचा अडचणीत आला आहे.
जिल्ह्यात २७ दिवसापासून पावसाची प्रदीर्घ दडी आहे. पावसासाठी संवेदनशील असणारे सोयाबीन पीक यामुळे धोक्यात आहे. सोयाबीन फुलोऱ्यावर असताना व शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाची नितांत गरज असते. परंतु पावसाच्या खंडामुळे जिरायती क्षेत्रामधील आधीच धोक्यात आले आहे. सोयाबीनवर खोडमाशीची अळी व चक्रभुंगाची अळी यामुळे सोयाबीनचे रोप पोखरल्या गेले आहे, पिवळ्या मोझॅकच्या अटॅकमुळे पिवळे होऊन पानगळ व शेंगा कमकुवत होत आहे. त्यात आता सकाळचे दाट धुके व दुपारचे कडाक्याचे ऊन यामुळे सोयाबीनचे पीक अडचणीत आले आहे. धुक्याचा प्रादुर्भाव सिंचन असलेल्या सोयाबीनवरदेखील मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. अचानक आलेल्या संकटामुळे हजारो हेक्टरमधील सोयाबीन गारद झाले असताना कृषी विभाग गाफील आहे.
ही ‘कॉम्प्लेक्स’ स्थिती
सोयाबीन पिकावर खोडमासी व चंद्रभृगा तसेच पिवळा मोझॅकचा अटॅक यामुळे शेंगा पोचट, दाणे कमकुवत होतात यामुळे सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांनी कमी येण्याची शक्यता आहे. ही ‘कॉम्प्लेक्स’ स्थिती आहे. यात धुरळणीची भर पडल्याने सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.
असे करावे व्यवस्थापन
पाने मलून पडलेली असल्यास २ टक्के युरीया किंवा २ टक्के पोटॅशिअम नायट्रेट हे २ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून तातडीने फवारणी करावी, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.

असा झाला
धुक्यांचा परिणाम
आपल्या भागात दाट धुके ‘फॉग’ हे ‘स्मॉग’ बनले आहे. धुवारणीनंतर सोयाबीनच्या पानावर दवबिंदू तयार होतात. प्रदूषण अधिक असल्याने दवबिंदूमध्ये कार्बनडाय आॅक्साईड व सल्फरडाय आॅक्साईडचे कण मिसळले जातात. हे आम्लधर्मीय असल्याने व पीएच तीन टक्क्यांपेक्षा कमी असल्यास सोयाबीनच्या पानांचे रंध्र दव शोषूण घेतात आणि झाड अचानक मलूल पडते, असे प्रादेशिक संशोधन केंद्राचे सोयाबीनरोगतज्ज्ञ योगेश इंगळे यांनी सांगितले.

तिवसा तालुक्यात सोयाबीनच्या काही शेतांमध्ये पाहणी केली. मात्र, मोझॅक, खोडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. धुक्यामुळे सोयाबीनचे पीक मलूल पडल्यास सध्या याबाबत सांगणे शक्य नाही.
- दत्तात्रेय मुडे,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

दोन दिवसांपासून अचानकपणे सोयाबीन सुकत आहे. स्प्रिंकलरने यापूर्वीच पाणी दिले. सोयाबीनवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
- सुरेश मुंधडा,
शेतकरी, कुऱ्हा.

Web Title: The fury of dense fog, soyabean malleon on thousands of hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.