राज्यातील ६८९ गावांमध्ये डिसेंबरपश्चात पाणीटंचाई, ‘जीएडीए’चा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 05:17 PM2019-11-20T17:17:39+5:302019-11-20T17:49:45+5:30
राज्यातील भूजल संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी पाच मुख्य खो-यांचे विभाजन १,५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे.
- गजानन मोहोड
अमरावती : राज्यात आॅगस्टनंतर पावसाने सरासरी पार केली असली तरी अमरावतीसह मराठवाडा विभागातील १४ तालुक्यांत मात्र, पाऊस माघारला. त्यामुळे ६८९ गावांमध्ये तीन मीटरपर्यंत भूजलात कमी आलेली आहे. या सर्व गावांमध्ये डिसेंबरपश्चात पाणीटंचाई राहणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा (जीएसडीए) राज्यातील ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेण्यात आल्यानंतर हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. पाणीटंचाईचा अहवाल मागील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आलेला आहे.
राज्यातील भूजल संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी पाच मुख्य खो-यांचे विभाजन १,५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे. या क्षेत्रात प्रचलित धोरणानुसार ३,९२० विहिरी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्याची भौगोलिकता, भूशास्त्रीय संरचना आणि दिवसेंदिवस वाढता भूजल उपसा लक्षात घेता पाणी पातळीची अचूक माहिती होण्याकरिता आता जलस्वराज प्रकल्पांतर्गत ३२ हजार ७६९ गावांतील विहिरींचा अभ्यास केल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा संभाव्य पाणीटंचाई संदर्भातील अहवाल पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना शनिवारी सादर करण्यात आला. यामध्ये १२,०१५ विहिरींच्या पाणी पातळीत तूट आढळून आली. यानुसार १२ तालुक्यांतील ३५९ गावांमध्ये जानेवारीपश्चात पाणीटंचाईची झळ पोहचणार आहे. ३३० गावांत एप्रिलपासून पाणीटंचाईचे संकट राहणार आहे.
पाणीटंचाईची कारणे
पावसात खंड व यामुळे सिंचनासाठी भूजलाचा अमर्याद उपसा, सिंचनासाठी विंधन विहिरींद्वारे अतिखोल जलधारातून होणारा अतिउपसा, सिंचनासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव आदींमुळे भूजलात कमी आलेली आहे व त्यामुळे सदर गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे.
जिल्हानिहाय संभाव्य पाणीटंचाईची गावे
यामध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ३९ गावे, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात ४७ गावे, कळंब तालुक्यात ६ गावे, केळापूर तालुक्यात ४८ गावे, राळेगाव तालुक्यात ९ गावे, यवतमाळ तालुक्यात १४ गावे तसेच मराठवाड्यात लातूर तालुक्यात ८० गावे, देवाणी तालुक्यात २२ गावे, उदगीर तालुक्यात ८५ गावे, उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यात ९७ गावे, पारंडा तालुक्यात ९५ गावे, परभनी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात ७६ गावे, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात ४२ गावे व नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील २९ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे.