गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाघांसाठी ‘रेड झोन’; संवेदनशील गावात जनजागृती
By गणेश वासनिक | Published: January 6, 2023 06:10 PM2023-01-06T18:10:31+5:302023-01-06T18:10:50+5:30
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ॲक्शन प्लॅन
अमरावती : व्याघ्रांसाठी संरक्षित क्षेत्र कमी पडत असल्याने ते जंगलाबाहेर येत आहेत. यात गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून तो टाळण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना वन्यजीव विभागाला मिळाल्या आहेत. एकंदरीत वाघांसाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाघांसाठी ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आढावा घेतला होता. यात वन्यजीवांमुळे होणारी मनुष्यहानी, पीक नुकसानाची प्रकरणे, नुकसान भरपाई आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्याअनुषंगाने वन्यजीव विभागाने वाघांपासून ज्या गावांना धोका आहे, ती गावे संवेदनशील म्हणून जाहीर करून त्या गावात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हे तीन जिल्हे वाघांसाठी ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे.व्याघ्र प्रकल्पानजीकच्या संवेदनशील गावांत घरोघरी जाऊन उपाययोजनांची माहिती दिली जाईल. जिल्हा विकास योजना, कॅम्पा, निसर्ग संवर्धन व वन्यजीव व्यवस्थापनमूधन संवेदनशील गावांचा विकास केला जाणार आहे.
संवेदनशील गावात मिळेल वाघांची माहिती
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या तीन जिल्ह्यातील संवेदनशील गावांमध्ये वाघ अथवा अन्य मांसभक्षक वन्यप्राणी असल्यास याबाबत अगोदरच अलर्ट मिळणार आहे. या गावांमध्ये थर्मल सेन्सार, वच्युअल कुंपण, पीटीझेड कॅमेरा लावण्यात येणार आहे. तसेच गावांच्या सीमेवर जाळीदार कुंपण लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सौर उर्जा कुंपण लावण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याकरिता लाभार्थींना ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.
जलद बचाव दलाचे होणार बळकटीकरण
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे संवेदनशील गावांत वन विभागाचे जलद बचाव गटाचे बळकटीकरण केले जाणार आहे. अत्याधुनिक प्रशिक्षण, यंत्र सामुग्री जलद बचाव गटाला दिली जाणार आहे. ज्या भागात वाघांचा वावर आहे, त्या भागांचा अभ्यास करून जीआयएस नकाशे तयार करुन संवेदनशील आणि साधारण अशी गावांची वर्गवारी करण्यावर भर असणार आहे.
मॅन ईटर वाघांचे होणार स्थलांतर
मानव -वाघ संघर्ष हाताळताना तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार मॅन ईटर वाघांचे स्थलांतर केले जाईल. कायदेशीर कार्यवाही करून वाघांना बंदीस्त करणे, गुरे-ढोरांसाठी चारा उपलब्ध करणे, कुरण विकास क्षेत्र निश्चित करणे, संवेदनशील गावात स्थानिक बचाव दलाचू निर्मिती करणे, गावकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण करणे, संवेदनशील गावांचे सर्वेक्षण करून राहणीमान, उपजिविकेचे साधनांमध्ये वाढ केली जाणार आहे.