गाडगेबाबा पुण्यतिथी शोभायात्रेने दुमदुमली अंबानगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:38 PM2018-12-21T22:38:19+5:302018-12-21T22:38:32+5:30
लोकोत्तर संत, कर्मयोगी गाडगेबाबा यांची जनमानसातील महती ठसठशीतपणे पुढे आली ती गुरुवारी सकाळी समाधी मंदिरातून निघालेल्या पुण्यतिथी शोभायात्रेने. बुधवारी रात्री १२.२० वाजता हजारोंनी मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा हा समुदाय एकत्र आला. प्रत्येकाच्या मुखातून ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ हा उत्स्फूर्त घोष निघत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकोत्तर संत, कर्मयोगी गाडगेबाबा यांची जनमानसातील महती ठसठशीतपणे पुढे आली ती गुरुवारी सकाळी समाधी मंदिरातून निघालेल्या पुण्यतिथी शोभायात्रेने. बुधवारी रात्री १२.२० वाजता हजारोंनी मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा हा समुदाय एकत्र आला. प्रत्येकाच्या मुखातून ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ हा उत्स्फूर्त घोष निघत होता.
शोभायात्रेत हजारो आबालवृद्ध सहभागी झाले. संजीवनी कॉलनी, प्रेरणा कॉलनी, राधानगर मार्गे पुन्हा गाडगेनगर येथील समाधी मंदिरात शोभायात्रा पोहोचली. यादरम्यान नागरवाडी येथील संत गाडगेबाबा आश्रामशाळेचे विद्यार्थी प्रथेनुसार सहभागी झाले. पंचक्रोशीतील पालख्या व दिंड्या होत्या. संत गाडगेबाबा चॅरिटेबल ट्रस्टचा स्वच्छता अभियान रथ होता. त्यांच्यासह विविध बँड पथके शोभायात्रेत होती. हनुमान भजन मंडळ (नरसिंगपूर), जय गुरुदेव सेवा मंडळ शिवण (बु.), शंभुशेख भजन (शिरजदा), श्रीकृष्ण भजन मंडळ (एंडली), ज्ञानेश्वर भजन मंडळ (कुकसा), गाडगेबाबा भजन (आमला), गाडगेबाबा मंडळ (पिंगळा), महर्षी वाल्मीकी भजन मंडळ (खालकोनी), शारदा उत्सव मंडळ (खोलापूर), गजानन महाराज भजन मंडळ (शिवण), गजानन महाराज भजन मंडळ (खैरी), गजानन महाराज भजन मंडळ (रावळगाव), दुर्गादेवी भजन मंडळ (पुंड), वारकरी भजन मंडळ (रोहणखेडा), रुक्मिणी महिला भजन मंडळ (रोहनखेडा) आदी दिंड्यांसह शाकंबरी प्रतिष्ठान (मूर्तिजापूर) यांच्याकडून टाळ-मृदंग, ढोल-ताशांचा निनाद व जल्लोष या ठिकाणी करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत देशमुख (रा. दादर), सागर देशमुख, भारत रेळे, डॉ. कावरे, मुख्यध्यापक किशोर चौधरी यांच्यासह हजारो भाविक शोभायात्रेत सहभागी झाले होते. गाडगेबाबा समाधी मंदीर ट्रस्ट अमरावती, नागरवाडी येथील आश्रामशाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे आयोजनाकरिता सहकार्य लाभले.