गडकरी, फडणवीस रोज यावेत..

By admin | Published: December 27, 2015 12:26 AM2015-12-27T00:26:20+5:302015-12-27T00:26:20+5:30

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध कानाकोपऱ्यात सुरू असलेली स्वच्छता मोहीम, रस्त्यांचे रुंदीकरण, गतिरोधकांचे सपाटीकरणासह विविध कामे युध्दस्तरावर सुरू आहेत.

Gadkari, Fadnavis everyday .. | गडकरी, फडणवीस रोज यावेत..

गडकरी, फडणवीस रोज यावेत..

Next

अमरावती चकाकली : मंत्र्यांचा दौरा अन् डागडुजी सुरू
अमरावती : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध कानाकोपऱ्यात सुरू असलेली स्वच्छता मोहीम, रस्त्यांचे रुंदीकरण, गतिरोधकांचे सपाटीकरणासह विविध कामे युध्दस्तरावर सुरू आहेत. नागरिक व लोकप्रतिनिधींकडून वारंवार पाठपुरावा करूनही या कामांना मुहूर्त मिळत नव्हता. मात्र, केंद्रातील ज्येष्ठ मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री येत असल्याने संबंधित विभागाला खडबडून जाग आली आहे. या दोन नेत्यांच्या रविवारच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमिवर अमरावतीला चकाकी आली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना एकाऐकी सुचलेले हे शहाणपण पाहता गडकरी, फडणवीस रोजच यावेत, अशी अपेक्षा अमरावतीकर व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यातील विविध बांधकामाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी येथील दसरा मैदानावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन होत असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर गडकरी, फडणवीस या जोडगोळीची मोठमोठी फलके लागली आहेत. त्या अनुषंगाने महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रमुख विभागासह अन्य संबंधित विभाग जागे झाले आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये शहरातील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग व वाहतूक नियम दर्शक पट्टे मारण्यात आलेत. वाहतूक नियमनासाठी महापालिकेने नियम दर्शक पट्टे अंकित करून द्यावेत, अशी मागणी वाहतूक शाखेने कित्येक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडे लावून धरली होती. मात्र त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. तथापि, नऊ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी केंद्रातील वजनदार मंत्री गडकरी आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्री येत असल्याने सारेच अधिकारी कर्मचारी झाडून कामाला लागले आहेत. कधी नव्हे ते दोन्ही उड्डाण पुलावर केरकचरा गोळा करून उड्डाण पुल स्वच्छ करण्यात आला. याशिवाय दुभाजकावरील कचरा कुंडी गेल्या दोन वर्षांपासून भग्नावस्थेत होत्या. त्यासाठी मोठी ओरडही होत होती. गडकरी, फडणवीस येण्याची वर्दी मिळताच प्रशासनाची सूत्रे हलली आणि रात्र, दोन रात्रीतच लक्षावधी रुपयांची तरतूद करून शहर चकाचक करण्यात आले. आपली पाठ थोपटून घेण्यासाठी शासकीय यंत्रणेत जणू काही स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Gadkari, Fadnavis everyday ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.