गजभिये दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:27 PM2018-03-31T22:27:47+5:302018-03-31T22:27:47+5:30
शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अॅड. सुनील गजभिये व त्याची पत्नी राजेश्री या दोघांना शनिवारी न्यायालयीन कोठडीत मिळाली असून, त्यांना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
अमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अॅड. सुनील गजभिये व त्याची पत्नी राजेश्री या दोघांना शनिवारी न्यायालयीन कोठडीत मिळाली असून, त्यांना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील हत्याकांडातील आरोपींची गाडगेनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले. दोघांनाही १० एप्रिलपर्यंतची न्यायालयीन कोठडी मिळाली. शीतलची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याची कबुली दिल्यानंतर आता पोलीस आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याच्या कामी लागले आहे. या हत्याकांडाशी जुळलेल्या प्रत्येक बाबीवर पोलीस लक्ष ठेऊन आहे. शुक्रवारी चांदुरबाजार रोडवरील गजभियेच्या मंगल कार्यालयातील मॅनेजरची पोलीस आयुक्तसमक्ष पेशी करण्यात आली. गजभिये शीतलच्या हत्येपूर्वी अर्धातास गायब होता. तो मंगल कार्यालयात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, मॅनेजर दाम्पत्यांच्या चौकशीनंतर गजभिये मंगल कार्यालयात गेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याअनुषंगाने सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी चौकशी केली.
विहिरीतील पाणी उपसासाठी वीज कनेक्शन : शीतलचा मोबाईलचे शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील विहिरीतील पाणी मशिनद्वारे उपसण्यास सुरुवात केली. तीन दिवसांपासून पाणी उपसा सुरू आहे. मशिनच्या डिझेलसाठी पोलिसांना सुमारे १५ हजार रुपये खर्च आला. मात्र, अद्याप विहिरीचे तळ दिसले नाही. अजूनही विहिरीत १५ ते २० फूट पाणी शिल्लकच आहे. त्यामुळे आता वीज कनेक्शन घेऊन विद्युत मशिनद्वारे पाणी उपसा केला जाणार असून त्याकरिता वीज जोडणी मिळाली आहे.