सुवर्णालंकार लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:23 AM2019-08-18T01:23:16+5:302019-08-18T01:23:54+5:30

चांदूरबाजार येथील भवानी ज्वेलर्स फोडणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, दोन अद्यापही पसार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Gajaad, an interstate gang looting gold | सुवर्णालंकार लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

सुवर्णालंकार लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

Next
ठळक मुद्देसाडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूरबाजार येथील भवानी ज्वेलर्स फोडणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, दोन अद्यापही पसार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शिवासिंग पीरसिंग दुधाती शिकलकरी (२८, रा. आंबोली, ठाणे, मुंबई), मुखत्यारसिंग जोगनसिंग टांक (३२, रा. वडाळी) व करणसिंग छगनसिंग भोंड (२४, रा. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ९ आॅगस्ट रोजीच्या मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास चांदूर बाजारातील भवानी ज्वेलर्स फोडून अज्ञात चोरांनी ३१ लाख ६० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. धनंजय गोविंद सांबधारे (४५) यांच्या तक्रारीवरून चांदुरबाजार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. घटनेचे गाभीर्य पाहता पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. व अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावल्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार करून, त्यांना वेगवेगळ्या दिशेने तपासाचे काम देण्यात आले. आरोपी ज्या मार्गाने चांदूर बाजारपर्यंत दाखल झालेत, अशा सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. या चौकशीदरम्यान आरोपींनी चांदूरबाजारात चोरी करण्यापूर्वी कारंजा घाडगे व नागपूर रोडवरील कोंढाळीतील ज्वेलरी दुकान फोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आरोपी हे नागपूरच्या दिशेने पसार झाले. आरोपींनी काटोल मार्ग वरूडात प्रवेश केला. तेथून ९ आॅगस्ट रोजीच्या रात्री आसेगावात जाऊन एक ज्वेलर्स शॉप फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री २.३० वाजताच्या भवानी ज्वेलर्स फोडले.
एलसीबीचे यशस्वी डिटेक्शन
पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी वेळोवेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेत्तृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पेंदोर, एएसआय मूलचंद भांबूरकर, पोलीस हवालदार सचिन मिश्रा, शकील चव्हाण, संदिप लेकुरवाळे, सुनील तिडके, नितेश तेलगोटे, त्र्यंबक मनोहरे, विनोद इंगळे, गजेंद्र ठाकरे, प्रवीण अंबाडकर व सायबरच्या टीमने मोठे परिश्रम घेऊन या गुन्ह्याचा छडा लावला.
७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून ८०० ग्र्रॅमची चांदी, १७० गॅ्रमचे सोन्याचे दागिने व ५९ हजारांची रोख जप्त केली आहे. याशिवाय गुन्ह्यातील साहित्य व नकली दागिनेसुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे.
मुंबईत शिकलकरींचा सोने विक्रीचा व्यवसाय
भवानी ज्वेलर्स फोडून आरोपी रिधोरा येथे गेले आणि तेथे गुन्ह्यात वापरलेले साहित्य फेकून दिले. या गुन्ह्यात वडाळी येथील रहिवासी मुखत्यारसिंग असल्याची माहिती पोलिसांच्या हाती चौकशीत लागली. पोलिसांनी वडाळीत जाऊन पाहणी केली असता, तो घरी सापडला नाही. तो मुंबई गेल्याची माहिती मिळताच पोलिसांची दोन पथके मुंबईला रवाना करण्यात आली. मुंबईतील ठाणे स्थित आंबोली शिकलकरी सोनेविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांना माहिती पडले. त्यानुसार पोलिसांनी पंटरला पाठवून दागिने विक्रीबाबत खात्री केली. तेथून पोलिसांनी शिवा दुधातीला अटक करून, त्याच्याजवळील सोने व रोख जप्त केली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी अंबरनाथवरून मुखत्यारसिंगला व जालनावरून करणसिंग भोंड यांना अटक केली. त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यात येत आहे.
मुरगड ठाण्याच्या हद्दीतून चोरली कार
आरोपींनी गुन्हे करण्याच्या उद्देशाने मुरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक कार चोरली होती. त्या कारने विविध शहर तथा राज्यात फिरून ते चोरी करीत होते.
राज्यासह आंध्रातही केली चोरी
आंतरराज्यीय टोळीतील मुख्य सूत्रधार शिवासिंग दुधाती हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत चोरी करीत होता. राज्यातील मुंबई, कल्याण, ठाणे याशिवाय आंध्रप्रदेशातही त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: Gajaad, an interstate gang looting gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर