महिलेच्या व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:08+5:302021-06-19T04:10:08+5:30
अमरावती : फेसबुकवर व इन्स्टाग्रामवर विवाहित महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिला व्हिडीओ कॉल केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर ...
अमरावती : फेसबुकवर व इन्स्टाग्रामवर विवाहित महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिला व्हिडीओ कॉल केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने व्हिडीओ कॉलचे रेकाॅर्डिंग महिलेच्या फ्रेन्डलिस्टमध्ये व नातेवाईकांना व्हायरल करणाऱ्या आरोपीला अखेर ग्रामीण सायबर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करीत त्याला गजाआड केले.
धनंजय दिलीप कदम (१९, रा. मालणगाव ता. मालेगाव जि. नाशिक) याला मालेगाव येथून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तपासाला गती आली होती, हे विशेष!
सदर महिलेने ८ एप्रिल २०२१ रोजी परतवाडा ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर सदर प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. अज्ञात आरोपीने महिलेशी सोशल मीडियावरून मैत्री केली. तिला व्हिडीओ कॉल केले. त्यानंतर व्हिडीओ रेकॉर्डिंग व मॅसेज फेसबुकवर पाठवून तिची समाजात बदनामी केली.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, उपनिरीक्षक व्ही. एस. चौबे, पीएसआय वसंत कुरई व त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून सदर आरोपीला अटक केली.