अचलपुरातील गाझी दर्गा वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: March 30, 2015 12:09 AM2015-03-30T00:09:25+5:302015-03-30T00:09:25+5:30
येथील ऐतिहासिक दुल्हे रहमान शाह गाजी यांचा दर्गा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
अचलपूर : येथील ऐतिहासिक दुल्हे रहमान शाह गाजी यांचा दर्गा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येथे नियोजनबध्द व्यवस्थापन नसल्याने भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दर्ग्यावर सुयोग्य व्यवस्थापनाकरिता प्रशासक नियुक्त करावा यासाठी दीपक श्रीराम थोरात ऊर्फ मो. युसूफ यांनी प्रयत्न सुरु केले आहे. या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार मनोज लोणारकर यांना दिले. ही मागणी त्वरित पूर्ण न केल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत थोरात यांनी तहसीलदारांना सादर निवेदनात म्हटले की, दुल्हे रहमान शाह गाझी यांच्या दर्गा परिसरात गांज्या ओढणारे टोळीने बसतात. त्यात काही नामांकित राजकीय व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. येथे येणाऱ्या इबादती लोकांच्या धार्मिक कार्यात व्यत्यय निर्माण होतो. येथे सफाई कामगार व चौकीदार नसल्याने भाविकांना अस्वच्छता व असुविधांचा सामना करावा लागतो. बिच्छन नदी दर्गा ट्रस्टच्या मालकीच्या जागेतून वाहते. ही नदी परतवाड्याकडून येत नसल्याने शहरातील घाण नदी परिसरापर्यंत येते. त्यामुळे दर्ग्याचे पावित्र्य भंग पावते. दर्गा ट्रस्ट नदी स्वच्छतेचे काम करण्यास असमर्थ आहे. तसेच आर्थिक नियोजन सुयोग्य पद्धतीने नसल्यामुळे आर्थिक नियोजनासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नाही. दर्गा ट्रस्टने एका बिनपगारी चौकीदाराची नियुक्ती केली असून त्याने गांज्याच्या नशेत असताना मशिदीत नमाज पढत असलेल्या एका व्यक्तीला अपमानित केले. नमाजात बाधा आणली. दर्ग्यातील नमाज पढविणारे इमाम व सफाई कामगारांना पगार नाही. दर्गा ट्रस्टची शेती व जमिनीची ट्रस्ट सांभाळून ट्रस्टची आर्थिक स्थिती बळकट करण्यासंदर्भात ट्रस्ट उदासीन असून कोणतेही ठोस पावले उचलण्यास तयार नाही. या सर्व बाबींची शासनाने दखल घेऊन या दर्ग्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी अन्यथा उपोषणाचा इशारा मो. युसूफ यांनी दिला आहे.