बडनेऱ्यात चालला गजराज

By Admin | Published: February 17, 2016 12:00 AM2016-02-17T00:00:10+5:302016-02-17T00:00:10+5:30

महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी बडनेरातील अतिक्रमण हटविले.

Gajraj in Badnera | बडनेऱ्यात चालला गजराज

बडनेऱ्यात चालला गजराज

googlenewsNext

अतिक्रमण निर्मूलन : आठवडी बाजार, मोतीनगरात मोहीम
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी बडनेरातील अतिक्रमण हटविले. नवीवस्तीतील आठवडी बाजार, सोमवार बाजार तसेच जुन्यावस्तीतील मोतीनगरच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ही कारवाई निरंतर सुरुच राहिल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त चंद्रकात गुडेवार यांच्या आदेशानुसार बडनेरा शहरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. गत काही महिन्यापासून बडनेरा शहरातील सोमवार बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रणम वाढीस लागले असताना ते रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. आठवडी बाजारात प्रत्येक सोमवारी बाजार भरतो. मात्र, हा परिसर अतिक्रमणाने वेढल्यामुळे दुकानदारांना बाजाराच्या जागेऐवजी रस्त्यांवर दुकाने थाटावी लागतात. यापूर्वी महापालिकेच्या आमसभेत आठवडी बाजारातील अतिक्रमणावर खल झाला होता.
सोमवार बाजारात काही विशिष्ट समाजाने जागा बळकावली असताना प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल सामान्य नागरिकांनी केला आहे.

बडनेरा अतिक्रमणाच्या विळख्यात
बडनेरा : सोमवार बाजारात अतिक्रमण वाढल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. भाजीपाला, धान्य खरेदीसाठी येणाऱ्या महिला, युवतींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बाजारासाठी जागा राखीव असताना महापालिका प्रशासनाने ती दुसऱ्या व्यवसायासाठी दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमिवर मंगळवारी मुख्य बाजार ओळीत रस्त्यालगतच्या हातगाड्या, पानटपरी, खोके, स्टॉल देखील जप्त करण्यात आले आहेत. आठवडी बाजारात काही महाभागांनी चक्क पक्के बांधकाम करण्याचा प्रताप केल्याचे अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या निदर्शनास आले.
मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे टिनाचे शेडस्, खोके आदी साहित्य ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. बडनेरा शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सलग तीन दिवस ही कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक उमेश सवाई, अभियंता नितीन बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक खराटे यांच्यासह पोलीस कर्मचारी, महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. बडनेरा शहरात अतिक्रमणाची समस्या गंभीर आहे. रस्त्यालगत हातगाड्या, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक समस्यांचा सामना बडनेरावासियांना करावा लागतो. मुख्य मार्गावरील अतिक्रमण ही समस्या मोठी असून ती दूर करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

Web Title: Gajraj in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.